टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये

लंडन: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेचा आठ विकेट्सनी पराभूत करीत अंतिम फेरीत धडक मारली. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवार, २३ जून रोजी खेळवण्यात येत असून, त्यात यजमान इंग्लंड विरुद्ध भारत अशी लढाई पाहयला मिळणार आहे.

कार्डिफ येथील उपांत्य सामन्यात श्रीलंकेने दिलेले १८२ धावांचे आव्हान भारताने केवळ दोन विकेट्स गमावून पार केले. या सामन्यात ईशांत शर्मा आणि आर. अश्विन या दोन गोलंदाजांनी भारताच्या विजयाचा पाया घातला. त्या दोघांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेऊन श्रीलंकेला ५० षटकांत आठ बाद १८१ धावसंख्येवर रोखले. मग शिखर धवनने रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या साथीने दोन मोठ्या भागीदारी रचून भारताला विजयपथावर नेले.

शिखर धवनने पुन्हा एकदा दमदार खेळी केली. त्याने रोहित शर्माच्या साथीने सलामीला ७७ धावांची आणि मग कोहलीच्या साथीने दुस-या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. धवनने सहा चौकार आणि एका षटकारासह ६८ धावांची खेळी केली. कोहलीने नाबाद ५८ धावांची खेळी केली. या स्पर्धेचा अंतिम सामन्यात रविवारी यजमान इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया अशी लढाई पाहयला मिळणार आहे.

Leave a Comment