स्नोडेनच्या सुखरूप सुटकेसाठी विकिलिक्सचे विमान तयारीत

हाँगकाँग दि. २१ – अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेची अतिमहत्त्वाच्या कारवायांसंबंधीची गुपिते जगजाहीर करून जगभरात खळबळ माजविणारा या संस्थेचा माजी कॉट्रक्टर एडवर्ड स्नोडेन याला हाँगकाँगमधून सुखरून आईसलँडमध्ये आणण्यासाठी विकिलिक्सची पार्टनर फर्म असलेल्या डेटा सेलचे प्रमुख ओल्फर विंगर यांनी खासगी विमानाची सोय केली असल्याचे जाहीर केले आहे.

विंगर हे विकिलिक्ससाठी मिळत असलेल्या डोनेशनसंबंधीची कामे पाहतात. ते म्हणाले की स्नोडेनला आईसलँडमध्ये राजाश्रय मिळावा यसासठी बोलणी सुरू असून कोणत्याही क्षणी त्याला येथे आणण्यासाठी आम्ही चीनमधील एका कंपनीचे खासगी विमान भाड्याने घेतले आहे. हे विमान जय्यत तयारीत असून त्यासाठी २ लाख ४० हजार डॉलर्स भाडे मोजण्यात आले आहे. आईललँडच्या सरकारकडून अनुकुल प्रतिसाद मिळताच स्नोडेनला या देशात आणले जाईल.

विकिलिक्सचा संस्थापक व सध्या इक्वेडरच्या लंडन दूतावासात असलेला असांजे हाही स्नोडेनच्या नातेवाईकांच्या संपर्कात असून आईसर्लंडमध्ये स्नोडेनला आश्रय मिळावा यासाठी प्रयत्नशील आहे. अमेरिकेने स्नोडेनच्या हस्तांतरणासाठी हाँगकाँगकडे अधिकृत विनंती केलेली नाही. आजच आपला ३०वा वाढदिवस साजरा करत असलेल्या स्नोडेनने २० मे रोजी अमेरिकेतून पळून जाऊन हाँगकाँगमध्ये आश्रय घेतला आहे.

Leave a Comment