उत्तराखंडातील बेपत्तांच्या शोधासाठी गुगलचे अॅप लाँच

नवी दिल्ली दि.२१- उत्तराखंडात पुराच्या हाहाकारात हरविलेल्या अथवा बेपत्ता झालेल्या नागरिकांच्या शोधासाठी गुगलने त्यांचे पर्सनल फाइंडर हे अॅप्लिकेशन भारतात लाँच केले आहे. पूर, भूकंप, त्सुनामी अशा कोणत्याही नैसर्गिक संकटात बेपत्ता झालेल्या नागरिकांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी या अॅपची चांगली मदत होते.

गुगलच्या क्रायसिस रिस्पॉन्स डिव्हीजनने हे अॅप जानेवारी २०१० मध्ये हैती येथे झालेल्या भूकंपातील बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तयार केले होते. हे एक वेब अॅप्लिकेशन असून अशा नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या आपल्या नातेवाईक, मित्रांचा शोध कुणीही या अॅपच्या मदतीने घेऊ शकतो. ते कोणत्या स्थितीत आहेत याचीही खबर या अॅपमुळे मिळू शकते. भारतातील उत्तराखंड राज्यात आलेल्या जलप्रलयात लक्षावधी नागरिक अडकून पडले आहेत. त्यांचा ठावठिकाणा समजावा यासाठी गुगलने  पर्सन फाईंडर २०१३ हे अॅप भारतात उपलब्ध करून दिले आहे.

जपानमध्ये २०११ साली झालेला ९ रिश्टर स्केलचा भूकंप आणि त्यानंतर आलेली त्सुनामी यावेळीही या अॅपचा यशस्वी वापर करण्यात आला होता तसेच अलिकडेच अमेरिकेतील बोस्टन मॅरेथॉनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतरही लापता असलेल्यांचा शोधासाठी हे अॅप वापरले गेले आहे. २०१० साली हैती येथे झालेल्या महाभयंकर भूकंपातही या अॅपच्या सहाय्याने अनेकांना आपापल्या जिवलगांशी जोडून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. विशेष म्हणजे यात अन्य अशाच रजिस्ट्रीकडून डेटा अॅक्सेप्ट करण्याची आणि एका ठिकाणी तो डिस्प्ले करण्याचीही सुविधा आहे.

Leave a Comment