सेमीफायनलमध्ये आज भारत-श्रीलंका झुंज

कार्डिक: चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुसरा उपांत्य सामना गुरुवारी भारत आणि श्रीलंका यांच्यात रंगणार आहे. इंग्लंडमधल्या कार्डिफच्या मैदानावर दोन्ही संघ आमने-सामने येत आहेत. यापूर्वी टीम इंडियाने विश्वचषकाच्या फायनलमध्ये श्रीलंकेला नमविले होते.

सव्वा दोन वर्षांच्या कालावधीत भारत आणि श्रीलंका संघांत १० वन डे सामने खेळवण्यात आले आहेत. टीम इंडियाने त्या दहापैकी सात सामन्यांमध्ये विजय मिळवून, भारत-श्रीलंका क्रिकेटवर अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. श्रीलंकेला मात्र टीम इंडियावर केवळ दोनच सामन्यांमध्ये मात करता आली आहे.

टीम इंडियाच्या दृष्टीने चॅम्पियन्स ट्रॉफीतली सर्वात जमेची बाजू आहे ती शिखर धवन आणि रोहित शर्मा या सलामीवीरांची सातत्यपूर्ण कामगिरी. धवनने पहिल्या दोन सामन्यांमध्ये वैयक्तिक शतकं ठोकलीच, पण रोहितच्या साथीने शतकी सलामीही दिली. पाकिस्तानसमोर धवनचे अर्धशतक दोन धावांनी हुकले, पण त्याआधी त्यानं रोहितच्या साथीने ५८ धावांची सलामी दिली होती.

श्रीलंकेची फलंदाजीही प्रामुख्याने कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने या अनुभवी शिलेदारांवर अवलंबून आहे. संगकाराने तीन सामन्यांत एका नाबाद शतकांसह २०५ धावा ठोकल्या आहेत, तर जयवर्धनेच्या नावार तीन सामन्यांमध्ये १३० धावा आहेत. त्यात नाबाद ८४ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

Leave a Comment