शिवसेनाच्या ४७ व्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सहानुभूतीदारांची पूर्ण निराशा केली आहे. शिवसेनेला नवा सामाजिक आणि राजकीय कार्यक्रम पुढे ठेवण्याच्या बाबतीत नवे पाऊल टाकता आलेले नाही ही गोष्ट या वर्धापनदिनाच्या निमित्ताने केलेल्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून स्पष्ट झाली आहे. शिवसेनेला सत्ता का हस्तगत करता येत नाही, याचा त्यांनी फार खोलात जाऊन विचार केलेला नाही. शिवसेनेचा मतदारवर्ग हा ठराविक आहे. ते बंधन तोडून शिवसेना सर्वांना सोबत घेऊन जाऊ शकेल अशी नीति उद्धव ठाकरे यांनी स्वीकारायला हवी होती. परंतु पुन्हा एकदा त्यांनी मराठी आणि हिंदुत्व या पूर्वसूरींनी आखून दिलेल्या मार्गाने जाण्याचेच ठरवले आहे. शिवसेनेचा वर्धापनदिन मुंबईत साजरा होतो. तसा तो वर्षानुवर्षे साजरा होत आलेला आहे. परंतु तो मुंबईतच साजरा करण्याच्या प्रथेला बगल देऊन राज्याच्या अन्य एखाद्या शहरामध्ये वर्धापनदिनाचा कार्यक्रम व्हावा एवढाही बदल उद्धव ठाकरे यांना करता आला नाही. बाळासाहेब ज्या मार्गांनी चालत राहिले त्याच मार्गावर मीही चालणार, असे जाहीर करून उद्धव ठाकरे यांनी सर्वांची मोठी निराशा केली आहे.
शिवसेनेची कुंठितावस्था
दोन दिवसांपासून या वर्धापनदिनाच्या सोहळ्याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. उद्धव ठाकरे या निमित्ताने काय जाहीर करतात याकडे जिज्ञासापूर्ण नजरा लागल्या होत्या. ही जिज्ञासा आणि उत्सुकता जेवढी तीव्र होती तेवढीच या कार्यक्रमानंतर घोर निराशा झाली आहे. शिवसेनेत नवी पिढी उदयाला आली आहे. या पिढीचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे. पण ते आपल्या स्वत:च्या संघटनात्मक प्रतिभेच्या आधारावर शिवसेनेचे स्वरूप बदलतील, नवा विचार स्वीकारतील या सगळ्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. गेल्या ७-८ वर्षांपासून उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून काम सुरू केले असले तरी बाळासाहेब ठाकरे हयात असल्यामुळे शेवटी सारे निर्णय बाळासाहेबच घेत होते आणि शिवसेनेवर उद्धव ठाकरे यांना आपला ठसा उमटवता येत नव्हता. आता मात्र शिवसेनेत घडणार्या घटनांची अंतिम जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावर आहे. तेव्हा उद्धव ठाकरे यांची शिवसेना कशी असेल, याचे दर्शन या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात होण्याची अपेक्षा होती. एखाद्या पक्षामध्ये पिढी बदलली की, संरचनेतही बदल होणे अपेक्षित असते. पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असे काही बदल झालेले नाहीत.
पक्षातली कोणतीही पहिली पिढी पक्षाच्या स्थापनेच्या काळातील वातावरणाच्या अनुरोधाने पक्षाचा पाया निश्चित करत असते. तसा शिवसेनेचे स्थापनेच्या वेळी केला होता. १९६० च्या दशकामध्ये संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होऊन सुद्धा मुंबईत मराठी माणूस पोरका झाला होता. मराठी माणसाला नोकर्या मिळणे मुश्कील झाले होते. ही खंत अनेक नेत्यांच्या मनामध्ये होती. परंतु पुढाकार घ्यायला कोणी तयार नव्हते. त्या काळात बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली. आता या गोष्टीला ४७ वर्षे झाली. बाळासाहेबांनी सुद्धा पक्षाच्या स्थापनेच्या वेळी स्वीकारलेला मराठी माणसाचा मुद्दा कायम ठेवत असतानाच हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली. म्हणजे काळानुरूप बाळासाहेबांनी सुद्धा पक्षाच्या धोरणाला हिंदुत्वाची जोड दिली. बदलत्या वातावरणानुसार पक्षाच्या भूमिकेमध्ये बदल केले नाहीत तर पक्ष मरणपंथाला लागतो. ही गोष्ट अनेक संघटनांच्या बाबतीत घडलीही आहे. या पक्षांनी आणि संघटनांनी आपल्या कार्यपद्धतीला नवे वळण दिले नाही. किंबहुना ते कसे द्यावे हे त्यांना कळलेच नाही. त्यामुळे त्यांचा जनाधार खचला. उद्धव ठाकरे यांनी या गोष्टीचा विचार केलेला दिसत नाही. त्यांनी पुन्हा एकदा हिंदुत्व आणि मराठी माणूस हेच विषय शिवसेना हाती घेईल, असे प्रतिपादन केले. उद्धव ठाकरे यांची शिवसेना काळाची गरज ओळखणारी असेल अशी अपेक्षा होती, पण ती फोल ठरली आहे.
मराठीकरणाचा मुद्दा आता मागे पडत चालला आहे. मुंबईमध्ये परराज्यातले लोक मोठ्या संख्येने आले. त्यामुळे महाराष्ट्राची राजधानी असून सुद्धा मुंबईत मराठी ऐकायला मिळेनाशी झाली. ही खंत आहे ही गोष्ट खरी; पण ती केवळ मुंबईची आहे असे नाही तर देशाच्या सर्व मोठ्या शहरांमध्ये थोड्याबहुत फरकाने हीच अवस्था आहे. बंगळूर शहरात कन्नड बोलणार्यांपेक्षा तमिळ बोलणार्यांची संख्या जास्त आहे आणि हैदराबादमध्ये तेलुगू भाषा बोलणारे लोक अभावानेच दिसायला लागले आहेत. देशाच्या औद्योगिक प्रगतीला गती आल्यामुळे स्थलांतराचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे प्रादेशिकतेची भावना जोपासताना ही वस्तुस्थिती लक्षात ठेवावी लागत आहे. संघटनेमध्ये असा काही बदल करण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी मोठी विचाराची झेप दाखवून दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या वैचारिक वाटचालीमध्ये कुंठितावस्था येण्याची शक्यता आहे. कोणत्याही संघटनेच्या वाढीसाठी संघटना कार्यरत ठेवावी लागतेच. परंतु संघटनेचे कार्यक्रम आणि चळवळी, आंदोलने या त्या संघटनेच्या वैचारिक बैठकीवर ठरत असतात. शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नवी वैचारिक दिशाच निवडलेली नाही. त्यामुळे नव्या चळवळी आणि आंदोलने याही बाबतीत उद्धव ठाकरे नवे काही करू शकलेले नाहीत.
