प्रतिभाताईंच्या पुणे निवासस्थानासाठी सीआरपीएफ सुरक्षा

पुणे दि.२० – भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनण्याची संधी मिळालेल्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या निवृत्तीनंतरच्या पुण्यातील निवासस्थानासाठी पॅरामिलिटरी गार्ड सुरक्षेला केंद्राने हिरवा कंदिल दाखविला आहे. सीआरपीएफचे २५ ते ३० गार्ड पुण्याच्या पाषाण भागातील बंगल्यावर सुरक्षेसाठी नेमण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मिळाल्यानंतर येथे गार्डसाठी सेंट्री पोस्ट आणि त्यांच्या निवासासाठी घरे बांधण्याचे काम सुरू झाले असल्याचे समजते.

आजपर्यंत केंद्रीय राखीव पोलिस दल म्हणजेच सीआरपीएफचे जवान अँटी नक्षल कारवायांसाठीच प्रामुख्याने कार्यरत होते. त्यानंतर दीर्घ काळानंतर या पथकांना सिक्युरिटी ड्यूटी देण्यात आली आहे. प्रतिभाताईंच्या बंगल्याच्या सुरक्षेसाठी येणारे जवान उत्तर भारतातील बटालियन मधून येणार आहेत असे समजते. गेल्या वर्षीच प्रतिभाताईंच्या या बंगल्यासाठी नागरी विकास मंत्रालयाने परवानगी दिली होती. बंगल्यावर २४ बाय ७ सुरक्षा ठेवली जाणार आहे.

तत्पूर्वी सीआरपीएफ जवानाकडे नुकतीच व्हीआयपी सुरक्षेची ड्यूटीही सोपविली गेली असून उद्योजक व रिलायन्स समुहाचे मालक मुकेश अंबानी यांना अशी सुरक्षा दिली गेली आहे.