नामांतराचे वाद टाळा

महाराष्ट्रात काही नामांतराचे वाद जारी आहेत. मुंबईतल्या सागरी पुलाला कोणाचे नाव द्यावे असा वाद झाला. अनेकांनी अनेक सूचना केल्या पण सत्ता कॉंग्रेसच्या हातात असल्यामुळे त्यांनी राजीव गांधी यांचे नाव दिले. अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली. वांद्रा येेथे होत असलेल्या टमिंनसला बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे अशी मागणी पुढे आली आहे. दादर रेल्वे स्थानकाच्याही नावाचा वाद जारी आहे. असे अनेक वाद आहेत. त्यांची यादी मोठी आहे. अशा वादातून कसा आणि काय मार्ग काढावा असा प्रश्‍न असतो कारण नामांतरांचे विषय संवेदनशील आणि भावनांचे, अस्मितेचे झालेेले असतात. सध्या महापुरुष आणि नेते यांना आपण जाती जातीत वाटायला लागलो आहोत. कोणत्याही नेत्याचे नाव एखाद्या संस्थेला दिले जाते तेव्हा त्यांच्या जातीतल्या लोकांना आनंद होतो कारण त्यांनी कितीही काम केले असले आणि ते करताना जातीपातीचा विचार केला नसला तरीही ते कोणत्या तरी जातीत जन्माला आलेले असतातच आणि त्या जातीचे लोक त्यांचा आदर करत असतात. काही वेळा तर लोकांच्या अशा भावना भडकवण्यासाठी नामांतराचे वाद उपस्थित केले जात असतात
.
केवळ नेतेच नाही तर मानवतावादी संतांनाही आपण जाती जातीत वाटून टाकले आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि सध्या राजकारणामुळे जातींच्या अस्मिता अधिक बळकट होत आहेत. अशा या अनुचित वातावरणात एखाद्या नेत्याच्या नावाला कोणी तरी समर्थन देणे आणि कोणी तरी विरोध करणे या गोष्टी जातींच्या राजकारणाचे रूप घेतात. हा धोका ओळखून नामांतराचे निर्णय घेताना ते जातींचा विचार न करता आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना विश्‍वासात घेऊन घेतला पाहिजेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने नुकताच परभणी येथील मराठवाडा कृषि विद्यापीठाला महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. चालू वर्ष हे त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. या निमित्ताने त्यांचा गौरव करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. कै. वसंतराव नाईक हे १९६३ ते १९७४ अशी अकरा वर्षे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळातच १९७२ चा दुष्काळ पडला. तो दुष्काळ फारच तापदायक ठरला. या संकटाशी नाईक यांनी चांगला मुकाबला केला. जगभरातल्या अर्थतज्ञांच्या कौतुकाचा विषय झालेली रोजगार हमी योजना याच काळात राबवण्यात आली.

वसंतराव नाईक हे यवतमाळ जिल्ह्यातले बंजारा समाजातल्या आणि स्वत: शेती करणारे प्रगतिशील शेतकरी होते. त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात राज्याच्या शेतीच्या संबंधाने अनेक क्रांतिकारक निर्णय घेऊन ते राबवले. त्यांचा शेतीशी असणारा संबंध आणि त्यांच्या कार्यकाळातली शेतीत झालेली प्रगती यामुळे या आधीच महाराष्ट्र शासनाने त्यांच्या जयंतीचा दिवस कृषि दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. मराठवाडा कृषि विद्यापीठाला त्यांचे नाव देणे पूर्णपणे उचित आहे. मात्र मराठवाडा आणि नामांतर यांचा असा काही तरी संबंध आहे की, असे नामांतर होणार म्हणताच वाद निर्माण होण्याची शक्यता वाटायला लागतेे. औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यावरून १९७८ साली मराठवाड्यात मोठे महाभारत झाले आहे. आधी असलेले मराठवाडा हे नाव पुसून त्या जागी बाबासाहेबांचे नाव देण्याने मराठवाड्याच्या अस्मितेला धक्का बसतो असे काही लोकांचे म्हणणे होते. त्यावरून प्रदीर्घ काळ संघर्ष झाला. १९९३ साली विद्यापीठाचे नामांतर न करता नामविस्तार करण्याचे ठरले. मराठवाडा हे नाव आहे तसेच कायम ठेवून त्याला बाबासाहेबांचेे नाव जोडण्यात आले. याच काळात स्थापन झालेल्या नांदेडच्या विद्यापीठाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा असे नाव देण्यात आले. हा सारा इतिहास माहीत असल्याने कृषि विद्यापीठाला नवे नाव देताना ते नामांतर न होता नामविस्तार व्हावा अशी दक्षता घेण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यात अशीच एक मागणी जोर धरायला लागली आहे. सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची ही मागणी आहे. तशा मागणीचा ठराव सोलापूर जिल्हा परिषदेत मंजूरही करण्यात आला आहे. अहिल्याबाई होळकर यांचे चरित्र जाणणारा कोणीही या मागणीला विरोध करणार नाही. काही वेळा एक खंत वाटते की, विद्यापीठाला नाव देताना शिक्षणासाठी जीवन समर्पण करणार्‍यांच्या नावाची आठवण कोणालाच का होत नसेल? महाराष्ट्रात शिक्षणाचा प्रारंभ महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केला. सावित्रीबार्ईंनी तर महिलांना शिक्षण मिळावे म्हणून काय कार सहन केले. एका विद्यापीठाला महात्मा फुले यांचे नाव दिलेले आहे पण एकाही विद्यापीठाला सावित्रीबाईंचे नाव दिले गेलेले नाही. त्यांच्या नावाचा आग्रहही कोणी धरत नाही. जातींच्या वर्तुळाच्या बाहेर जाऊन सर्वांनीच ही मागणी एकदा उचलून धरली पाहिजे.

Leave a Comment