न्यूयॉर्क दि.२० -अमेरिकन डिझायनर मोल्टन टेलर यांनी १९४९ साली बनविलेली जगातील पहिली उडती कार लिलावात विक्रीसाठी दाखल झाली असून त्यासाठी १० लाख र्डालर्स किंमतीची अपेक्षा वर्तविली गेली आहे. ही युनिक एरोकार फक्त हवेत उडते असे नाही तर ती सर्वसामान्य कारप्रमाणे रस्त्यावरही धावू शकते.
ही गाडी हवेत उडण्यासाठी बसविण्यात आलेली यंत्रणा सुटी करून कारच्या मागे जोडून गाडी रस्त्यातूनही चालविता येते. हवी तेव्हा ही यंत्रणा सहजतेने पुन्हा जोडता येते आणि कार हवेत उडविता येते. ११७ किमीच्या वेगाने जाणार्याज या कारचे पंख दुमडता येणारे आहेत त्यामुळे रस्त्यावर ही गाडी येते तेव्हा ती अन्य कारच्या आकाराचीच होते. २१ फूट लांबीच्या या कारमध्ये दोन जणांना बसता येण्याची सोय आहे. चार चाकेही गाडीला देण्यात आली असून पंखांची लांबी आहे ३० फूट.
ही गाडी तयार झाली तेव्हा जगभरात एकच औत्सुक्याची लहर निर्माण झाली होती. मात्र पंचवीस वर्षे सतत या गाडीचे कँपेनिग करूनही निर्माता टेलर याला एकही डील करता आले नाही. फोर्ड कंपनीबरोबर झालेले डीलही फिसकटले होते असेही समजते. टेलरने अशा प्रकारच्या चार गाड्या तयार केल्या आहेत मात्र संग्राहकांनी मूळ नमुना मॉडेल खरेदीसाठीच अधिक पसंती दर्शविली आहे असे सांगण्यात येत आहे.
आजच्या जमान्यातही या गाडीचे डिझाइन अप्रतिम या श्रेणीतील आहे. त्यावेळीही ही गाडी खूपच लक्षवेधी ठरली होती आणि तत्कालीन वर्तमानपत्रे, मासिके, पुस्तके, टिव्हीवरही याच गाडीची जोरदार चर्चा आणि चित्रे प्रसिद्ध केली गेली होती. १९७० साली जगावर कोसळलेल्या तेल संकटामुळे या गाडीच्या उत्पादनात गुंतवणक करण्यास कुणीच पुढे आले नाही असेही समजते.