सेमीफायनलमध्ये आज इंग्लंड द.आफ्रिका झुंज

लंडन – चँपियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये बुधवारी इंग्लंडची गाठ दक्षिण आफ्रिकेशी पडली आहे. स्पर्धेच्या इतिहासात यजमान संघाला दुस-यांदा अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. याउलट ‘चोकर्स’चा शिक्का पुसून टाकण्यास डेविलियर्स आणि सहकारी उत्सुक आहेत. यजमान इंग्लंडकडे जेतेपदाचा प्रमुख दावेदार म्हणून पाहिले जात आहे.

२००४ मध्ये मायदेशात झालेल्या स्पर्धेत इंग्लंडने अंतिम फेरी गाठली होती. मात्र त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरी गाठल्यास ‘फायनल’मध्ये दुस-यांदा धडक मारणारा तो पहिला यजमान संघ ठरेल. १९९८ मध्ये बांगलादेशात झालेल्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली. मात्र त्यानंतर पाचही वेळा त्यांना ‘फायनल’पर्यंत पोहोचता आले नाही. आंतरराष्ट्रीय स्पर्धामधील महत्त्वपूर्ण (नॉकआउट) लढतींत पराभूत होणारा संघ (चोकर्स) असा शिक्का त्यांच्यावर बसला आहे.

दक्षिण आफ्रिकेला संमिश्र यश मिळाले आहे. भारताविरुद्धच्या अपयशी मालिकेनंतर पाकिस्तानवर विजय मिळवून त्यांनी आव्हान जिवंत ठेवले. वेस्ट इंडिजविरुद्धची लढत पावसामुळे रद्द झाल्याने तसेच त्यापूर्वी भारताने विंडिजला हरवल्याने एबी डेविलियर्स आणि सहका-यांनी गटात दुसरे स्थान मिळवत अंतिम चार संघातील प्रवेश निश्चित केला. यजमान इंग्लंडकडे जेतेपदाचा प्रमुख दावेदार म्हणून पाहिले जात आहे. घरच्या पाठिराख्यांसमोर त्यांची कामगिरी उंचावली आहे. फॉर्मात असलेली कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक, इयन बेल, जोनाथन ट्रॉट, ज्यो रूट ही आघाडी फळी तसेच अष्टपैलू रवी बोपाराने फॉर्म राखल्यामुळे फलंदाजीची चिंता नाही. मात्र यजमानांना गोलंदाजीच्या समस्येने ग्रासले आहे. डु प्लेसिस आणि डेव्हिड मिलरने ‘पॅचेस’मध्ये का होईना, चांगली फलंदाजी केलीय. तेज गोलंदाज डेल स्टेनच्या पुनरागमनामुळे गोलंदाजीही मजबूत झाली आहे. मध्यमगती रायन मॅक्लॅरेन, ख्रिस मॉरिस, लोनवॅबो त्सोत्सोबे आणि डावखुरा फिरकीपटू रॉबिन पीटरसननेही प्रभावी मारा केलाय.

Leave a Comment