भावी युवराजामुळे ब्रिटन अर्थव्यवस्थेला मिळणार चालना

लंडन दि.१९ – ब्रिटनच्या राजगादीचा दोन नंबरचा वारसदार प्रिन्स विल्यम्स आणि प्रिन्सेस केट यांच्या पहिल्या बाळाची जम्मवेळ आता कांही दिवसांवर आली आहे. जुलैच्या मध्यावर राजगादीचा हा भावी वारसदार जन्मास येणार आहे. त्याच्या जन्मामुळे ब्रिटीश अर्थव्यवस्थेला चांगली चालना मिळेल असा अंदाज वर्तविला जात असून या काळात २४० दशलक्ष पौंडाची उलाढाल होईल असे सेंटर फॉर रिटेल रिसर्चचे संचालक जोशुआ बॅमफिल्ड यांचे म्हणणे आहे.

नवीन राजा किवा राणी जे काही होईल त्यांची कॉपी करण्यासाठी ब्रिटनमधील नव्याने पालक झालेले नागरिक पैसे खर्च करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. त्यात हे बालक जुलैत जन्माला येणार असल्याने नागरिकांना जादा खर्चासाठी थोडा वेळ हाताशी आहे. केट आणि विल्सम्सचा  एप्रिल ११ सालचा विवाह, त्यानंतर गतवर्षी जूनमध्ये साजरा झालेला राणी एलिझाबेथ हिच्या राज्ञीपदाचा हिरक महोत्सव व पाठोपाठ आलेले लंडन ऑलींपिक या सर्व इव्हेंटमध्ये पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले होते तसेच या काळात लोकांच्या खरेदीचे प्रमाणही चांगलेच वाढले होते.

नव्या वारसदाराच्या जन्माच्या आनंदा प्रित्यर्थ ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्री ४.८ दशलक्ष पौंडावर जाईल असा अंदाज वरील संस्थेने व्यक्त केला असून नागरिक ६२ दशलक्ष पौंड मद्यावर तर २५ दशलक्ष पौंड जेवण व मेजवान्यांवर खर्च करतील. तसेच या काळात पुस्तके, खेळणी, डीव्हीडी, संग्राह्य वस्तू यांची उलाढालही १५६ दशलक्ष पौंडावर जाईल असे बॅमफिल्ड यांचे म्हणणे आहे,

युवराज्ञी केटचा फॅशन जगतावर सध्याच मोठा प्रभाव पडला आहे आणि नवीन बाळ जन्माला येईल तशी त्यात अधिक वाढच होणार आहे. नवीन बाळाच्या वाढीच्या प्रत्येक पायरीवर नवनवीन फॅशन्स येतील आणि त्यासाठी नागरिक दाबून खर्चही करतील असे मिटेल संस्थेचे ट्रेंड डायरेक्टर रिचर्ड कोप यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment