पाखी हेगडेचे मराठीत पदार्पण

काही वर्षापूर्वी गटांगळ्या खाणारा मराठी चित्रपट आता बॉक्स ऑफिसवरील कमाईबरोबरच राष्ट्रीय पुरस्कारांवरही नाव कोरू लागला आहे. त्यामुळेच अन्य भाषिक प्रेक्षक व निर्माते-तंत्रज्ञांचेही लक्ष मराठी चित्रपटांनी वेधून घेतले आहे. अन्य भाषिक निर्माते मराठी चित्रपटांच्या निर्मितीकडे वळत
असतानाच कलाकारही त्यात मागे नाहीत. हिंदी तसेच अन्य प्रादेशिक चित्रपटांमधले अनेक नामवंत कलाकार मराठीत पदार्पण करण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. आता पाखी हेगडे ही प्रादेशिक चित्रपटांमधील आघाडीची अभिनेत्री मराठी प्रेक्षकांसमोर प्रथमच येत आहे.

‘सत ना गत’मधून पाखी हेगडे हा नवा चेहरा मराठीत पदार्पण करत आहे. अर्थात मराठी प्रेक्षकांसाठी हा चेहरा नवा असला तरी प्रादेशिक चित्रपटांसाठी पाखी हे नाव नवे नाही. २५हून अधिक प्रादेशिक चित्रपटांमध्ये तिने आघाडीच्या भूमिका साकारल्या आहेत. मराठीतल्या पदार्पणाविषयी ती म्हणते की, मी महाराष्ट्रातच लहानाची मोठी झाले असून माझे शिक्षणही मराठीतूनच झाले आहे. अन्य भाषिक चित्रपटांतून काम करतानाच मराठी चित्रपट करण्याची
माझी तीव्र इच्छा होती. त्यामुळे या चित्रपटसृष्टीतील घडामोडींकडे माझे लक्ष असायचे. ‘सत ना गत’ या राजन खान यांच्या गाजलेल्या कादंबरीवरील चित्रपटातील मुख्य भूमिकेविषयी विचारणा झाल्यानंतर नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.’’

उत्तम आणि सशक्त कथानक असलेल्या आणि मनोरंजनाबरोबरच प्रेक्षकांची वैचारिक भूक भागवणा-या चित्रपटांत काम करण्याची संधी फक्त मराठीतच मिळते, असे मतही तिने व्यक्त केले. मराठी मातीशी आपले वेगळेच नाते असल्यामुळे या चित्रपटात काम करताना एक वेगळीच मायेची ऊब जाणवली, असेही तिने सांगितले. राष्ट्रपतींचे सुवर्णकमळ विजेता ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या चित्रपटांनंतर ‘देविशा फिल्म्स’तर्फे प्रेक्षकांसाठी या आणखी एका दर्जेदार, आशयघन आणि
करमणूकप्रधान चित्रपटाची प्रस्तुती करण्यात येत आहे. मनोरंजन करतानाच सामाजिक जाण जपणारे चित्रपट प्रेक्षकांना द्यायचे, ही ‘देविशा’ची परंपरा कायम ठेवणारा हा चित्रपट असल्याचे मत ‘देविशा फिल्म्स’चे अध्यक्ष अभिजीत घोलप यांनी व्यक्त केले.

साई शंकर फिल्म्सची निर्मिती असलेल्या ‘सत ना गत’मध्ये महेश मांजरेकर, सयाजी शिंदे आणि भरत जाधव प्रथमच एकत्र रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत. कवी नितीन तेंडुलकर यांच्या गीतांना प्रवीण कुंवर यांनी स्वरसाज चढवला असून दिग्दर्शन राजू पार्सेकर यांचे आहे. गोविंद निहलानी दिग्दर्शित ‘विजेता’, ‘अर्धसत्य’ यांसारख्या गाजलेल्या आशयघन कलाकृतींचे सहायक दिग्दर्शक म्हणून कारकीर्दीला सुरुवात करणारे पार्सेकर यांचा ‘सत ना गत’ आपल्या गुरूच्याच परंपरेतला चित्रपट आहे.

Leave a Comment