पाटना- भाजप-जदयूची युती तुटल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आज सत्वपरीक्षेला सामोरे जाणार आहेत. त्यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी बुधवारी विशेष अधिवेशन बोलावले असून, या अधिवेशनात त्यांना बहुमत सिद्ध करायचे आहे. जदयूचे एकूण ११८ सदस्य आहेत. याशिवाय चार अपक्ष आमदारांचा त्यांना पाठिंबा मिळाला आहे. याशिवाय काँग्रेसची साथही मिळण्याची शक्यता आहे. तथापि पक्षांतर्गत दगाबाजीची भीती अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी विश्वासदर्शक ठराव ही एक अग्निपरीक्षाच असल्याचे म्हटले जात आहे.
नितीशकुमार यांना मदत करण्यासाठी मतदानाच्या वेळी काँग्रेसचे आमदार अनुपस्थित राहू शकतात. त्यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सरकारला अप्रत्यक्ष साथ देण्याचे ठरविलेले दिसते. सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी १२२ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. तथापि, व्हीप जारी करूनही काही आमदार अनुपस्थित राहिल्यास धोका होऊ शकते, अशी शक्यता आहे. याचीच जदयू नेत्यांना अधिक चिंता आहे. जदयू रालोआतून बाहेर पडल्यानंतर जदयूचे काही सदस्य नाराज असल्याचे म्हटले जात आहे.
विशेष अधिवेशनात विधानसभेतील चित्र आता बदललेले दिसेल. सरकारी पक्षाच्या समोर भाजपचे ९१ सदस्य आणि राजद, काँग्रेसचे सदस्य समोरच्या आसनावर बसतील. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांत तणावाची स्थिती राहील. आतापर्यंत नेहमीच नितीशकुमार यांचा बचाव क़रणारे भाजप नेते त्यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या गोटात चिंतेचे वातवरन आहे.