उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची सर्वांना उत्सुकता

मुबई – शिवसेनेचा बुधवारी ४७ वा वर्धापनदिन होत आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने वर्धापन दिनाला महत्व प्राप्त झाले आहे. यावेळी आयोजित पदाधिका-यांच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनपर भाषणाबाबत उत्सुकता असणार आहे. ते यावेळी काय बोलणार याकडे पक्षाच्या कार्यकत्यांसह, राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे यंदा हा वर्धापनदिन अत्यंत साध्या पद्धतीने पार पडणार आहे. शिवसेनेचा ४७ वा वर्धापनदिनाचा कार्यक्रम आज माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे यावर्षी मनोरंजनाचा कोणताही कार्यक्रम होणार नाही मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेली पोकळी भरुन काढणे.आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना कार्यक्रम आखून देण्याची जबाबदारी त्यंच्यावर असणार आहे.

गेल्या दोन विधानसभा निवडणुका उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लढलेल्या असल्या तरी बाळासाहेब ठाकरेंचे नैतिकबळ त्यांच्या पाठिशी होते. मात्र, आता बाळासाहेब हयात नसताना पहिल्यांदाच उद्धव यांना पक्षप्रमुख म्हणून आगामी निवडणुकांना सामोरे जायचे आहे. त्यामुळे स्वाभाविक सर्व जबाबदारी उद्धव यांच्यावर आहे. त्यामुळे उद्धव काय करिश्मा दाखवतात याकडे केवळ राज्याचेच नव्हे तर एनडीएचा घटक पक्ष म्हणून देशाचेही लक्ष लागले आहे.