सानियाने पती शोएबला आणले अडचणीत

बर्मिंगहॅम, दि.१९ – टीम इंडियाला पाठिंबा देणारी सानिया मिर्झा हॉटेलमध्ये शोएब मलिकबरोबर थांबल्याने पाकिस्तान क्रिकेटमध्ये वादाची ठिणगी पडलेय. त्यातच शोएब मलिकने तीन सामन्यात केवळ २५ धावा केल्याने पाक संघाच्या कोचने तसेच पाकिस्तानी नागरिकांनी त्याच्यावर टीकेची झोड उठविली आहे.

पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये सुरु असलेले वाद मिटण्याचे चिन्ह नाही त्यातच भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झामुळे नव्याने वादाची ठिणगी पडली आहे. या प्रकरणी सानियाचा पती आणि पाक टीमचा आघाडीचा खेळाडू शोएब मलिकवर संघ व्यवस्थापकांनी टीकेची तोफ डागली आहे. पीसीबीने खेळाडूंना पत्नीसोबत हॉटेलमध्ये थांबण्यास सक्त मनाई केली आहे. या नियमाचे उल्लंघन करून शोएब सानियासोबत हॉटेलमध्ये थांबला. दरम्यान, कोच व्हॉटमोर यांची पत्नीदेखील याच हॉटेलमध्ये थांबली होती. सपोर्ट स्टाफच्या ज्युलियन फर्नांडोच्या मैत्रिणीचेदेखील हॉटेलमध्ये येणे-जाणे सुरू होते.

सध्या सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सुमार कामगिरीमुळे शोएब मलिकवर टीकास्त्र सोडले जात आहे. मात्र टीम इंडियाला पाठिंबा देणारी सानिया भलतीच खूश आहे. पाक टीमसोबत असल्यावरही मी टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना केली. भारताने विजय मिळवावा आणि माझ्या पतीने धावा काढाव्या, हाच माझा फंडा आहे, असेही सानियाने सांगितले.

Leave a Comment