फडणवीस-उद्धव भेटीत नवी रणनीती

मुंबई – ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर फडणवीस प्रथमच उद्धव यांना भेटले. ‘मातोश्री’वरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीतच शिवसेना-भाजप युतीच्या वाटचालीसंबधी काहीशी नवी रणनीती ठरविण्यात आले असल्याचे समजते.

फडणवीस हे ‘मातोश्री’वर पोहचल्यानंतर त्यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत जावून त्यांच्या प्रतिमेला नमस्कार केला. त्यानंतर उद्धव आणि फडणवीस यांच्यात आगामी लोकसभा निवडणुका, दुष्काळ तसेच राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवरही दोघांमध्ये चर्चा झाली असल्याचे समजते.

‘मातोश्री’शी जिव्हाळ्याचे संबंध असलेले भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे फडणवीस कट्टर समर्थक आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांचेही ‘मातोश्री’शी सलोख्याचे संबंध राहणार हे आजच्या उद्धव-फडणवीस भेटीने स्पष्ट झाले आहे. या भेटीवेळी शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते सुभाष देसाई, आमदार आशिष शेलार उपस्थित होते.

Leave a Comment