जबलपूर दि.१९ – असह्य उकाड्यापासून सुटका देणे हे पंख्याचे मुख्य काम असले तरी आजकाल सिलिंग फॅनला लटकून आत्महत्या करणार्या तरूणांचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसून येत आहे. या मुळे अस्वस्थ बनलेल्या जबलपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रोफेसर असणार्या कार्डिऑलॉजिस्ट आर.एस. शर्मा यांनी आत्महत्त्या रोखणारा पंखा तयार करण्याचा ध्यास घेतला आणि अगदी अल्प किमतीत व साध्या सुधारणा करून असा पंखा बनविलाही आहे. आता या पंख्याच्या पेटंटसाठी ते प्रयत्नशील आहेत.
शर्मा सांगतात त्यांच्या शेजारीच राहणार्या एका मुलाने बारावीत अपयश आले म्हणून सिलिंग फॅनला टांगून घेऊन गळफास घेतला. तेव्हापासूनच आत्महत्येसाठी पंखा उपयोगी पडू नये असे काहीतरी केले पाहिजे हा ध्यास त्यांनी घेतला. सुसाईड प्रूफ सिलिग फॅन बनविण्यासाठी त्यांनी पुष्कळ विचार केला, पंख्याचे कार्य कसे चालते ते अभ्यासले आणि मग वेल्डर आणि मेकॅनिक्सकडे सतत फेर्या मारून असा पंखा बनविला.
सिलिंग फॅनमध्ये असलेल्या शाफ्टच्या आत पोकळ धातूची नळी असते व त्यालाच पंख्याची पाती व मोटर जोडलेली असते. डॉ. शर्मा यांनी याच ठिकाणी मोटर व पात्याशिवाय पंचवीस किलोपर्यंत वजन पेलू शकतील अशा चार हेवी स्प्रिंग बसविल्या. त्यामुळे पंचवीस किलोपेक्षा जास्त वजन फॅनवर आले तर या स्प्रिंग उलगडल्या जातील अशी व्यवस्थाही केली. त्यामुळे समजा एखादी व्यक्ती सिलिंग फॅनला लोंबकाळली तरी स्प्रिंग उलगडतात आणि ती व्यक्ती सरळ जमिनीवर येते. अगदी फास लावून घेतला असला तरीही संबंधित व्यक्तीचे पाय जमिनीला टेकतात व फास बसत नाही.
डॉ. शर्मा यांच्या मते पंख्याला फास लावून जीव देणार्याचा मृत्यू अतिशय वेदनादायक असतो. मात्र सिलिंग पंख्यात स्ट्रेचेबल शाफ्ट बसविला तर हा धोका राहणार नाही व फास लावला असला तरी व्यक्तीला किरकोळ ओरखडे येण्यापलिकडे अधिक कांही होणार नाही. या सुधारणेसाठी चारशे साडेचारशे रूपये अधिक खर्च पंख्यासाठी करावा लागेल. हे पंखे घरात, हॉस्टेलवर फारच उपयुक्त ठरतील असेही शर्मा यांचे म्हणणे आहे.