अहमदाबाद दि.१९ – देशाची राजधानी दिल्लीकडे गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी कूच करणार हे नक्की झाल्यानंतर त्यांच्या जागी गुजराथची धुरा कुणाकडे सोपविली जाईल याची चर्चा जोरात सुरू असून मोदींच्या निकटच्या सहकारी व नागरी विकास मंत्री आनंदीबेन पटेल यांचे नांव प्रामुख्याने घेतले जात आहे. अन्य नांवात अर्थमंत्री नितीन पटेल, उर्जा मंत्री सौरभ पटेल व बीजेपीचे अध्यक्ष रणछोडदास फाल्दु यांचीही चर्चा आहे.
मोदींच्या मंत्रीमंडळात असलेल्या ७२ वर्षीय आनंदीबेन मोदींच्या अत्यंत निकटच्या सहकारी मानल्या जातात. मोदींच्या मंत्रीमंडळात नागरी विकास, नागरी घरबांधणी, महसूल, रस्ते व इमारती अशी अनेक कळीची खाती त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली आहेत. एम एस्सी व एम.ए सुवर्णपदक विजेत्या असलेल्या बेन प्रसंगी मोदींपेक्षा अधिक कडक पण तितक्याच समजूतदार आहेत असे सांगितले जाते.
मेहसाणा भागातून आलेल्या आनंदीबेन यांनी महिला सबलीकरण आणि महिलांच्या अन्य प्रश्नासाठी झटून काम केले आहे. मोदी आणि त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काळातील दिवसांपासून चांगले मित्र आहेत. काश्मीरमध्ये १९९२ साली लाल चौकात मोदींनी तिरंगा फडकविला तेव्हा त्यांच्यासोबत त्या एकट्याच भाजप महिला नेत्या होत्या. भाजप महिला विंगचे अध्यक्षपद, त्यांनंतर १९९४ ते ९८ या काळात राज्यसभा सदस्य आणि १९९८ साली प्रथमच केशुभाई पटेल यांच्या सरकारात कॅबिनेट मंत्रीपद त्यांनी भूषविले होते.
लेवा पाटील कुटुंबातील असलेल्या आनंदीबेन यांचा विवाह कडवा पटेल जमातीतील मफतलाल यांच्याशी झाला असून दोन्ही पटेल जाती जमातींत त्यांना मानाचे स्थान असल्याचे सांगितले जाते. सध्या त्यांच्याकडे अहमदाबाद आणि सुरत अशा प्रमुख शहरांचा चार्जही दिला गेला आहे.