नरेंद्र मोदींची अयोध्या भेट महत्त्वाची – विहिंप

अयोध्या दि.१८- भाजपने निवडणूक प्रचारप्रमुख पदी नेमणूक केलेले गुजराथचे मुख्यंमत्री नरेंद्र मोदी बुधवारी अथवा शुक्रवारी अयोध्येला भेट देणार असून त्यांची ही भेट आगामी निवडणुकांसाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे असे मत विहिप नेत्यांनी व्यक्त केले आहे. या भेटीत मोदी वादग्रस्त राममंदिर जागी भेट देऊन प्रार्थना करणार आहेत. जागी मोदींच्या स्वागतासाठी अशोक सिंघल, प्रवीण तोगडिया हे विहिप नेते तसेच गोरखपूरचे खासदार योगी आंदिनाथ, योगगुरू रामदेवबाबा आज म्हणजे मंगळवारीच अयोध्येत दाखल झाले आहेत.

या संबंधी अधिक माहिती देताना विश्व हिंदू परिषदेचे यूपी प्रवक्ते शरद शर्मा म्हणाले की १९९० सालात राम मंदिर चळवळीत सहभागी झालेल्या हिंदू साधू संन्याशांना व महंतानाही मोदी भेटणार असून त्यांची बैठकच आयोजित करण्यात आली आहे. अयोध्येतून मोदी जो संदेश देतील तो कार्यकर्त्यांसाठी आगामी निवडणुकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा ठरणार आहे. याचवेळी मोदी राम जन्म भूमी न्यास ट्रस्टचे महंत नित्य गोपाळ दास यांनाही भेटणार आहेत.

वादग्रस्त वास्तू पाडल्यानंतर मोदी यांची अयोध्येला पहिलीच भेट आहे. अर्थात १९९८ साली मोदी यांनी लालकृष्ण आडवानी यांच्यासह अयोध्येला भेट दिली होती मात्र त्यावेळी ते सध्याच्या राम मंदिर बांधकामाच्या ठिकाणी गेले नव्हते. मोदींची अयोध्या भेट आणि मंदिर भेट याचा अर्थ हिंदू फोर्स मोदी यांचा पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून गंभीरपणे विचार करत असल्याचे लक्षण असल्याचे तसेच आगामी निवडणुकांत गेल्या निवडणुकीत सोडलेला राम मंदिर मुद्दा पुन्हा आणला जाईल असे जाणकारांचे मत आहे.