गुवाहाटी दि.१८ – दुचाकी वाहन उत्पादनात देशात दोन नंबरवर असलेल्या होंडा मोटर्स व स्कूटर इंडियाने त्यांची नवी १५० सीसीची होंडा सीबी ट्रिगर मोटरसायकल ईशान्य भारतात सोमवारी सादर केली. या गाडीची किमत ७०,३१५ व ७९,९०० रूपये इतकी आहे. ईशान्य भारतातील किमान २० टक्के बाजारपेठ काबीज करण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले असल्याचे पूर्व भारत विभाग प्रमुख विवेक तलुजा यांनी सांगितले.
ही मोटरसायकल लिटरला ६० किमीचे अॅव्हरेज देते असा कंपनीचा दावा असून ती बजाजच्या पल्सरशी स्पर्धा करणार आहे. ईशान्य भारतात सध्या महिन्याला २६०० मोटरसायकल विकल्या जातात त्यातील २० टक्के वाटा मिळविण्याचा होंडाचा प्रयत्न आहे असेही ते म्हणाले.
गाडीच्या प्रचारासाठी गुवाहाटीपासून अरूणाचल मार्गे तवांग पर्यंत एका बाईक रॅलीचेही आयोजन करण्यात आले असल्याचे समजते. कंपनीने ईशान्य भारतात वितरकांचे जाळे अधिक मजबूत करण्यावरही लक्ष दिले असून सध्या येथे १७ वितरक आहेत त्यात आणखी तीन चार वितरकांची भर या वर्षअखेर घातली जाणार आहे असेही तलुजा यांनी सांगितले.