केन्द्रीय मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाला. त्यात आठ मंत्री समाविष्ट करण्यात आले. सीसराम ओला (वय८६), माणिकराव गावित (वय ७८), मल्लिकार्जुन खर्गे (७२), ऑस्कर ङ्गर्नांडिस (७१), गिरीजा व्यास (६६), सांब सदाशीव राव (६९), संतोष चौधरी (६८), जे सेलीवम (६० वर्षे) तशा तरुण मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. हा विस्तार आगामी निवडणुकांवर नजर ठेवून करण्यात आला आहे. कोणत्याही सरकारला निवडणुकीवर डोळा ठेवण्याचा अधिकार आहे. एकदा सत्ता हाती आल्यानंतर ती पुन्हा पुन्हा आपल्या हाती आली पाहिजे असे वाटण्यात चूक काही नाही. तसा निवडणुकीवर नजर ठेवून मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यातही काही चूक नाही पण अशी नजर ठेवण्याचे दोन प्रकार असू शकतात. चांगले, कार्यक्षम, तज्ञ आणि तळमळीचे मंत्री निवडून त्यांच्याकडून चांगले काम करून घेऊन तसेच कारभार उत्तम करून पुन्हा निवडून येेण्याची आशा बाळगता येते. तशी ती बाळगली पाहिजे तरच कोणत्याही सरकारचा कारभार चांगला होईल. पण मनमोहन सिंग सरकारने निवडणुकीवर डोळा ठेवून मंत्रिमंडळाचा विस्तार करताना कारभार चांगला होण्याचा नाही तर जातीय समीकरणांचा विचार केला आहे.
हातून निसटून जाण्याची भीती असलेल्या राज्यांत तसेच नजिकच्या काळात विधानसभा निवडणूक होणार असलेल्या राज्यात तिथली राजकीय समीकरणे साधण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवला आहे. या अर्थाने निवडणुकीवर डोळा ठेवणे आणि त्यासाठी गुणवत्तेपेक्षा जातीला महत्त्व देऊन मंत्र्यांची निवड करणे हे अनुचित आहे. तो सरकारचा हक्क असला तरीही. या विस्ताराने पंतप्रधानांनी काय साधले असे विचारले जात आहे पण त्याचे चांगले उत्तर कोणालाच सापडत नाही. नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या मंत्र्यांची वये आणि आधीच्या मंत्र्यांची वये यांचा तपशील जाणणार्या एक पत्रकाराने म्हटले आहे. पंतप्रधानांनी हा विस्तार करून मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांची संख्या पुन्हा ७७ वर नेली आहे. त्याशिवाय द्रमुकच्या मंत्र्यांच्या जागी कॉंग्रेसच्या मंत्र्यांची वर्णी लावली आहे. मनमोहनसिंग यांनी आणखी एक गोष्ट साध्य केली आहे ती म्हणजे मंत्रिमंडळाचे सरासरी वय ६४ वर्षांवरून ६७ वर्षावर नेले आहे. राहुल गांधी यांनी तरुणांना पुढे आणण्याचा नारा दिला होता. तो प्रत्यक्षात आणून निदान पन्नाशीचे मंत्री नेमले असते तरी मंत्रिमंडळाचे वय ६४ वरून घटून ६०-६२ झाले असते पण आता नेमलेले मंत्री सत्तरीचे आणि जीवनाच्या आठव्या दशकाकडे वाटचाल करणारे आहेत. नव्याने मंत्रिमंडळात घेतलेल्या मंत्र्यांपैकी सर्वात तरुण मंत्री साठ वषार्र्ंचे आहेत. त्यातले सर्वात ज्येष्ठ मंत्री सीसराम ओला हे ८६ वर्षांचे आहेत. या आठ मंत्र्यांचे सरासरी वय ७३ वर्षे आहे. या ७३ वर्षीय सदस्यांच्या समावेशाने केन्द्रीय मंत्रिमंडळ ६७ वर्षांचे झाले आहे. आता वर्षा दीड वर्षाने निवडणुका होत आहेत. म्हणजे निवडणुकीच्या मैदानात कॉंग्रेसचे सत्तरी गाठलेले मंत्रिमंडळ जनतेला कौल मागणार आहे. हे मंत्री देशाचे भविष्य घडवण्यासाठी मते मागतील पण ते स्वत: इतिहासाची साक्ष ेदेणारे असतील. मनमोहनसिंग यांनी यूपीए दोन मंत्रिमंडळाचा विस्तार चार वेळा केला पण यातल्या प्रत्येक विस्ताराच्या वेळी माध्यमांनी विस्ताराने निराशा झाल्याची भावना व्यक्त केली. आता निवडणुकीच्या तोंडावर केलेल हा बदल तर ङ्गारच निराशाजनक झाला आहे. आपल्याला तो तसा वाटत असला तरीही मनमोहनसिंग आणि सोनिया गांधी यांना तो समाधानकारकच वाटत असणार कारण त्यांनी या सर्वांची निवड त्यांच्या जातीवरून आणि गांधी नेहरू ङ्गॅमिलीशी असलेल्या निष्ठेेच्या निकषावर केली आहे. हा विस्तार झाल्यानंतर पत्रकारांशी बोेलताना पंतप्रधानांनी हॅटट्रिक करण्याची ग्वाही दिली आहे. त्यांचा विश्वास खरा ठरला तर आणि पुन्हा तेच पंतप्रधान झाले तर त्यांची ती तिसरी खेप संपेपर्यंत ते स्वत:च नव्वदीच्या उंबरठ्यावर उभे असतील.
आता ६७ वर्षांचे असलेले सारे मंत्रिमंडळ त्यांची खेप संपेपर्यंत अवघ्या पाऊणशे वयोमानाचे असेल. दंताजींचे ठाणे उठले, ङ्गुटले दोन्ही कान, नन्ना म्हणते मान अशा अवस्थेतले हे सरकार आपल्यावर राज्य करीत आहे या कल्पनेनेच शिसारी यायला लागते. वयाचा मुद्दा किती ताणावा याला काही मर्यादा आहे हे खरे पण कितीही तंदुरुस्ती सांभाळली तरीही ऐंशी वर्षाचा साधारण माणूस हा कामाचा नसतो हे मान्यच करावे लागेल. एखादाच मोरारजीभाई देसाई यांच्या सारखाच नैष्ठिक जीवन जगणारा नेता पंच्याऐंशी वर्षाचा असतानाही कार्यक्षम असतो. असे नेते अपवादच. मात्र जो नेता आपल्या साठीतही कार्यक्षम नव्हता त्याला ८६ व्या वर्षी मुंडावळी बांधणे हा भारतीय जनतेचा अपमानच आहे. ज्यांनी आपल्या आयुष्यातल्या कोणत्याच अवस्थेत कधी कामाचा उजेड पाडला नाही त्यांना अशा वृद्धावस्थेत मंत्री करायचे आणि वाढत्या वयाचे अनुभवाशी तसेच परिपक्वतेशी समीकरण मांडायचे ही तर अतिशयोक्ती झाली. असे हे वयस्कर मंत्रिमंडळ नेमताना एका बाजूला पक्षात तरुणाईला वाव देण्याच्या गप्पा मारणे तर नक्कीच विसंगतीने भरलेले आहे.