पहिल्या दिवशी दांडी मारणारे सात शिक्षक निलंबित

नांदेड – उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर सोमवारी १७ जून रोजी जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या. नांदेड जिल्ह्यत पहिल्याच दिवशी शाळेला दांडी मारणा-या एका मुख्याध्यापकासह सात शिक्षकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. हे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे यांनी दिले. पहिल्याच दिवशी केलेल्या या कारवाईने शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. आगामी काळात ही कारवाई सुरुच ठेवणार असल्याचा सुतोवाच भांगे यांनी केला आहे.

नांदेड येथील सीईओच्या विशेष पथकाने पहिल्याच दिवशी पाहणी करण्यासाठी लोहा तालुक्यातील शाळांना भेटी दिल्या. सावरगांव ( न ) येथील शाळेची पाहणी केल्यानंतर मुख्याध्यापक शाळेत आले नव्हते. मुख्याध्यापकाची चौकशी केल्यानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून मुख्याध्यापक एम . टी . पवार गैरहजर असल्याने त्यांना तात्काळ निलंबीत करण्याचे आदेश भांगे यांनी दिले. सीईओंच्या पथकाने जानापुरी येथील प्राथमिक शाळेला भेट दिली असता तीन शिक्षक बेपत्ता असल्याचे दिसून आले . संतप्त झालेले सीईओने मिनाक्षी लोलगे, शुभांगी गुंडाळे, सुनिता भुरे या तीन महिला शिक्षिकांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

त्यानंतर सीईओच्या पथकाने पोलिसवाडी येथील शाळेला भेट दिले असता एम. एस. पवार हे शिक्षक गैरहजर असल्याचे आढळून आल्यामुळे त्यांच्याही निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले. माळेगांव येथील शाळेला सीईओच्या पथकाने भेट दिली असता एस. पी. फड व एस. एम. घाळे या दोन शिक्षिकांचे शाळेत आगमन झाले. त्यामुळे त्या दोघांनाही निलंबीत करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी प्रमाणे आगमी काळात ही कारवाई सुरुच ठेवणार असल्याची माहिती सीईओ सुमंत भांगे यांनी दिली. यामुळे शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.

Leave a Comment