शिक्षणाचा विकास निर्देशांक काढणार – मुख्यमंत्री

पुणे, दि. 17 (प्रतिनिधी) – शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाचा मानवी विकास निर्देशांक तपासण्यात येणार आहे. प्रगत देशांच्या तुलनेत आपण पैसे खर्च करण्यात कमी पडत असल्याने ती उणीव आपण परिश्रमांनी भरून काढणे आवश्य आहे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी राज्य शासनाच्या वतीने यावर्षीपासून विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी मुख्यमंत्री चव्हाण यांनी हे मत व्यक्त केले. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार अ‍ॅड. जयदेव गायकवाड, बाप्पू पठारे, स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे,माजी राज्यमंत्री अ‍ॅड. चंद्रकांत छाजेड,माजी आमदार उल्हास पवार, शिक्षणमंडळाचे अध्यक्ष बाबा धुमाळ, उपाध्यक्ष नरेंद्र व्यवहारे,महापालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, आरपीआयचे गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी विकास देशमुख,महापालिका आयुक्तमहेश पाठक, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ आदी याप्रसंगी उपस्थित होते.

शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असून गेल्या काही वर्षांत शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत, असे स्पष्ट करूनमुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, अन्य देशांकडेमोठ्या प्रमाणात आर्थिक क्षमता आहे;मात्र, त्या तुलनेत भारतात आर्थिक विषमता जाणवत आहे. ही बाब लक्षात घेऊन भारत हा जागतिक पातळीवर स्पर्धा करू शकत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांची कार्यक्षमता वाढवायची असेल तर शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याची गरज आहे.
तळागाळातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी राज्य शासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरवत असताना त्यांच्या गुणवत्तेकडेही पुढील काळात लक्ष देण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाचा मानवी विकास निर्देशांक तपासण्यात येईल, असेही मुख्यमंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.
———————————————
-सोबत पुण्यातील रानडे बालक मंदिरातील प्रवेशोत्सवाचे दृश्य

Leave a Comment