लातूर, दि.१७ – वेगळ्या तेलंगण साठीचे आंदोलन पुन्हा एकदा पेटले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून आंध्रप्रदेशात जाणार्या चारशे पेक्षा अधिक बसेस न पाठविण्याचा निर्णय एस.टी. महामंडळाने घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रातून आंध्रप्रदेशात एसटी जाणार नाही
महाराष्ट्रातील लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि तालुकापातळीवरील छोट्या-छोट्या एस.टी. आगारातील चारशेपेक्षा अधिक बसेस आंध्रात रोज ये-जा करतात. आंध्रामध्ये कुठलही आंदोलन झालं की अगोदर महाराष्ट्रातील बसेसला टारगेट केले जाते. त्यामुळे बसेसचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मागेही तेलंगणाच्या आंदोलनामध्ये बसेसचे मोठ नुकसान झाले होते. हे नुकसान पुन्हा होवू नये म्हणून एस.टी.महामंडळाने हा निर्णय घेतला असल्याचे समजते.
तेलंगणाच्या राष्ट्रसमितीच्या कवीती समैय्या आणि विनय भास्कर या दोन आमदारांनी स्वतंत्र तेलंगणा न झाल्यास विधानभवनावरुन उडी मारण्याची धमकी दिली आहे. एवढच नाही तर आंध्रप्रदेशच्या विधानभवनावर काळा झेंडा फ़डकविला. सध्या हैद्राबाद मध्ये हे आंदोलन पेटलं आहे. अनेक आंदोलनकर्त्यांना अटकही करण्यात आली आहे. या आंदोलनाची तीव्रता आजही कमी झालेली नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
