दिग्विजयसिंग आता कर्नाटक, आंध्राचे प्रभारी

कॉंग्रेस पक्षाने काल मोठे संघटनात्मक ङ्गेरबदल जाहीर केले असून १२ नवे सरचिटणीस जाहीर केले आहेत. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि मुंबईतले खासदार गुरुदास कामत यांनी मंत्रिमंडळ ङ्गेररचनेत मनपसंत खाते न मिळाल्यामुळे मंत्रिपद नाकारले होते. आता त्यांना पक्षाचे सरचिटणीस करण्यात आले असून त्यांच्याकडे गुजरात आणि राजस्थान या दोन राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. राहुल गांधींच्या निकटवर्ती समजल्या जाणार्‍या दिग्विजयसिंग यांच्याकडे उत्तर प्रदेशाची जबाबदारी होती. मात्र उत्तर प्रदेशात पक्षाला चांगले यश मिळवून देण्यात त्यांना यश आले नाही, म्हणून त्यांच्याकडून हे राज्य काढून घेण्यात आले असून त्यांना आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यांचे प्रभारी करण्यात आले आहे.

कर्नाटकात कॉंग्रेसने बाजी मारली आहे. त्यामुळे कर्नाटकाची जबाबदारी ङ्गार अवघड नाही. परंतु आंध्र प्रदेशाची जबाबदारी हे दिग्विजयसिंग यांच्यासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. कालच मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले रेल्वे मंत्री डॉ. सी.पी. जोशी यांच्याकडे आता बिहार आणि आसाम या राज्यांचा प्रभार देण्यात आला आहे. आसामची जबाबदारी अवघड नाही, मात्र बिहारमध्ये त्यांना ङ्गार प्रयत्न करावे लागणार आहे. कारण बिहारच्या राजकारणाने आता वेगळी वळणे घ्यायला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशाची जबाबदारी मधुसुदन मिस्त्री यांच्यावर टाकण्यात आली आहे. ते राहुल गांधी यांचे निकटचे सहकारी मानले जातात.

कॉंग्रेसला आव्हानात्मक ठरणार्‍या राज्यांपैकी छत्तीसगडचा प्रभार बी.के. हरिप्रसाद यांच्याकडे, तमिळनाडूचा प्रभार मुकुल वासनिक यांच्याकडे, मध्य प्रदेशची जबाबदारी मोहन प्रकाश यांच्याकडे देण्यात आलेली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत ज्या राज्यातल्या खासदार संख्येला महत्व येणार आहे त्यातील पश्‍चिम बंगाल हे राज्य डॉ. सी.पी. जोशी यांच्याकडे तर महाराष्ट्र मोहन प्रकाश यांच्याकडे सोपवले गेले आहे. अंबिका सोनी, अजय माकन या दोघांवर संपर्क, प्रसिद्धी या जबाबदार्‍या राहणार आहेत.