जेडीयूचा भाजपाला रामराम

गेल्या सतरा वर्षांपासून भाजपाच्या हातात हात घालून काम करणार्‍या जनता दल (यु) या पक्षाने भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकला आहे. या पक्षाचे अध्यक्ष शरद यादव आणि प्रमुख नेते बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार या दोघांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. भारतीय जनता पार्टीने आपला सर्वोच्च नेता म्हणून नरेंद्र मोदी यांना पुढे करावी की नाही या मुद्यावरून या दोन पक्षात गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या धुसङ्गुशीचा परिणाम म्हणून ही ङ्गाटाङ्गूट झाली आहे. जेडीयू हा पक्ष भाजपापासून दूर गेला म्हणजेच भाजपा प्रणित एनडीए या आघाडीतून बाहेर पडला आहे. आता या आघाडीत केवळ अकाली दल आणि शिवसेना हे दोनच पक्ष राहिलेले आहेत.

नितीशकुमार यांनी ही भूमिका घेतल्यामुळे बिहारमध्ये सत्तेवर असलेल्या त्यांच्या पक्षासमोर बहुमताचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कारण गेल्या दहा वर्षांपासून तिथे जेडीयू आणि भारतीय जनता पार्टी यांच्या आघाडीचे सरकार आहे. भारतीय जनता पार्टीचे ९१ आमदार आणि ११ मंत्री या सरकारमध्ये आहेत. नितीशकुमार यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन ११ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळावे, अशी सूचना केली. त्याबरोबरच आता या सरकारला ९१ भाजपा आमदारांचा पाठींबा राहणार नाही. ३२४ सदस्यांच्या बिहार विधानसभेत आपण आपले बहुमत सिद्ध करू असा विश्‍वास नितीशकुमार यांनी व्यक्त केला आहे.

बिहारमध्ये या दोन पक्षाचे सरकार गुण्यागोविंदाने नांदत होते. तिथे कसलेही मतभेद कधी समोर आले नव्हते. मात्र नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावरून वाद झाला आणि या सरकारसमोर हा पेचप्रसंग उभा राहिला. माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यांनी बिहारमध्ये जंगलराज निर्माण केले होते. त्यांच्या काळातली सारी अनागोंदी संपवून तिथल्या नितीशकुमार सरकारने या राज्याला प्रगतीच्या मार्गावर आणण्याचे स्पृहणीय कार्य केले होते. आता जेडीयू आणि भाजपा या दोन पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत आणि भारतीय जनता पार्टीने आज नितीशकुमार यांच्या विरोधात बिहार बंदची हाक दिली आहे.

Leave a Comment