शाळेच्या आठवणी मनात दाटून आल्या की आपसुकच मन बालपणीच्या आठवणीत रममाण होतं. काही मोकळे क्षण मिळताच जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि शालेय जीवनातील आठवणींनी मनाचा मोगरा फुलून येतो. पण काहींच्या मनात मात्र शाळेच्या आठवणी म्हणजे प्राथमिक पातळीवर आयुष्याची घडी नीट सवण्यासाठी केली गेलेली धडपड अशाही असू शकतात. ‘माझी शाळा’ हा आगामी मराठी सिनेमा म्हणजे आठवणींचा खजिना नसून समाजातील सत्य भाष्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. पॅशनवर्ल्डच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘माझी शाळा’चे दिग्दर्शन शांतनु अनंत तांबे यांनी केले आहे. टॅन्जेन्ट एंटरटेनमेंटने पिकल एंटरटेनमेंटच्या सहयोगाने प्रस्तुत केलेला तसेच समाजातील एका ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष वेधून घेणारा ‘माझी शाळा’ येत्या 28 जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
‘माझी शाळा’ २८ जूनला प्रेक्षकांच्या भेटीस
नुकताच या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा हॉटेल कोहिनूर, प्रभादेवी येथे पार पडला. याप्रसंगी या चित्रपटातील प्रमुख कलाकार अरूण नलावडे, अलका कुबल-आठल्ये, देवेंद्र दोडके, दिपज्योती, अशोक पावडे, बबन जोशी, संचित यादव, पूर्णिमा व्हावळ, बालकलाकार आकाश वाघमोडे, दिग्दर्शक शांतनु तांबे, टॅन्जेन्ट एंटरटेनमेंटचे डॉ. अतुल यादगिरे, पिकल एंटरटेनमेंटचे समीर दिक्षित, हृषिकेश भिरंगी यांच्यासह तंत्रज्ञ तसेच चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
दिग्दर्शक शांतनु अनंत तांबे यांनी ‘माझी शाळा’च्या निमित्ताने शेतकऱयांच्या मुलांच्या शैक्षणिक जीवनावर प्रकाश टाकताना समाजातील एका गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधून घेतले आहे. थोरामोठ्यांच्या मुलांचा उदोउदो सारेच करतात, पण समाजातील उपेक्षित घटकांकडे लक्ष देऊन त्यांना मदतीचा
हात देण्यासाठी किती हात पुढे सरसावतात? हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. दिग्दर्शक शांतनु तांबे यांनी ‘माझी शाळा’द्वारे शेतकऱयांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित करताना आजही त्यांना शिक्षणासारख्या मुलभूत हक्कासाठी करावा लागणारा संघर्ष पडद्यावर रेखाटला आहे.
‘माझी शाळा’ची कथा रामचंद्र गणपत तुळसकर उर्प राम या शेतकऱयाच्या मुलाभोवती गुंफण्यात आली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर 15 किमी अंतरावर असलेल्या शाळेत जाऊन शिक्षण घेणाऱया रामची कथा प्रेरणादायी ठरणारी आहे. गावात शाळा नसताना शिक्षण घेऊन मोठे झाल्यावर स्वतची शाळा काढून शिक्षणाचा प्रकाश सर्वदूर पोहोचवण्याचे स्वप्न पाहणाऱया रामला किती संघर्ष करावा लागतो याची गाथा म्हणजे ‘माझी शाळा’ हा सिनेमा.
दिग्दर्शनासोबत ‘माझी शाळा’ची कथा-पटकथा-संवादलेखन शांतनु तांबे यांनीच केले आहे. केवळ मनोरंजनासाठी सिनेमा मान्य नसल्याने मनोरंजन करतानाच एखाद्या सामाजिक प्रश्नाला स्पर्श करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे शांतनु मानतात. शेतकऱयांच्या मुलाच्या शैक्षणिक जीवनावर आधारित सिनेमा बनवण्याचा विचार जेव्हा मनात आला तेव्हा यासाठी पटकथेसोबतच कलाकारांची योग्य निवड हेही एक मोठे आव्हान होते. त्यात अरूण नलावडे आणि अलका कुबल-आठल्ये यांसारख्या दिग्गजांनी मध्यवर्ती भूमिकेसाठी होकार दिल्याने आम्ही अर्धी लढाई जिंकली होती. सिनेमातील सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका अतिशय सहजपणे वठवल्या असल्याचे शांतनु दिलखुलासपणे सांगतात. सामाजिक मुद्द्यावर आधारित असलेल्या सिनेममाला कर्णमधुर
संगीताची किनार लावण्याचे पूर्वीपासूनचे मनात असल्याने एक ‘माझी शाळा’च्या रूपात साग्रसंगीत कलाकृती रसिकांसमोर सादर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे शांतनु मानतात.
‘माझी शाळा’ या सिनेमातील ‘‘रात सरकली…’’ हे गीत हृषिकेश कोळी यांनी लिहिले असून संचिता मोरजकर आणि विवेक नाईक यांनी गायले आहे. ‘‘उरांत घेऊन स्वप्न बावरे, नव्या दिशेने तूच धावरे…’’ हे खास प्रमोशनल गाणेही कोळी यांच्या लेखणीतून आकाराला आले असून विवेक नाईक यांनी गायले आहे. या दोन्ही गीतरचना सचिन-दिपेश या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केल्या असून पार्श्वसंगीतही त्यांचेच आहे. मराठीतील ज्येष्ठ अभिनेते अरूण नलावडे या सिनेमात मध्यवर्ती भूमिकेत असून मराठी रसिकांची लाडकी अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये त्यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. याखेरीज जयंत सावरकर, देवेंद्र दोडके, दिपज्योती, अशोक पावडे, बबन जोशी, संचित यादव, पूर्णिमा व्हावळ आणि बालकलाकार आकाश वाघमोडे आदी कलाकारांच्या या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. छायालेखनाची जबाबदारी विनायक जाधव यांनी यशस्वीपणे पार पाडली असून सुरेश नागनाले यांनी चपखलपणे या सिनेमाचे संकलन
केले आहे. कला दिग्दर्शन विजय मयेकर यांचे आहे.