भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेली एनडीए ही आघाडी आता जवळपास संपल्यात जमा आहे. भाजपाला नेमके काय करायचे आहे हे काही कळत नाही पण आता तरी पक्षात राजकीय धोरणाविषयीचा संभ्रम कायम असल्याचे जाणवत आहे. काय केल्याने आपल्याला केन्द्रातली सत्ता मिळेल याबाबत त्यांच्यात नेहमीच गोंधळाची स्थिती असते. १९८० साली या पक्षाने स्थापनेच्या वेळी गांधीवादी समाजवाद आपलासा केला होता. पण नंतरच्या दोन निवडणुकांत त्यांना गांधी मते मिळवून देत नाहीत असे दिसले. त्यावर १९८६ साली संघ परिवारात एक प्रश्नावली फिरली आणि सर्वांनी तिच्यामार्फत असे मत व्यक्त केले की, मते मिळवून देण्यासाठी गांधींपेक्षा राम चांगला आहे. मग रामाच्या नावावर मते मिळवून भाजपाने दिल्ली काबीज केली पण एकदाच. रामाच्या नावावर भारतातल्या मतदारांना कायम मोहून टाकता येत नाही आणि ठेवले तरीही पक्षाची खासदार संख्या २०० पर्यंत जात नाही. मग पक्षाने रामाला वनवासाला पाठवले आणि विकासाचा कार्यक्रम हाती घेतला.
रालोआघाडी संपुष्टात
गंमतीचा भाग असा की, राम अर्थात हिदुत्व आणि विकास या दोन्हींच्या बाबतीत त्यांना नरेन्द्र मोदी हेच सर्वात प्रभावी नेते वाटतात. म्हणून भाजपाने मोदी यांना पुढे केले आहे. मोदी यांचा आणखी एक फायदा आहे. ते ओबीसी आहेत म्हणजे त्यांच्या निमित्ताने हाही वर्ग भाजपाच्या जवळ येणार आहे. असे असले तरीही भाजपाचे हे नेतृत्व आपल्याला मात्र घातक ठरेल अशी भीती भाजपाप्रणित रालोे आघाडी तल्या मित्रपक्षांना वाटत आहे. त्यामुळे यापूर्वी म्हणजे १९९८ ते २००४ या काळात ज्या १८ पक्षांनी भाजपासोबत सत्ता उपभोगली त्यांनी आता भाजपाशी मैत्री तोडली आहे. हे सारे पक्ष वाजपेयी यांच्या मवाळ नेतृत्वाखाली एकत्र आले होते त्यांना आता मोदी यांचे नेतृत्व मान्य नाही. भाजपाचे नेते मोदी असतील तर भाजपालाही मते मिळणार नाहीत आणि आपल्यालाही मिळणार नाहीत असा त्यांचा दावा आहे. आता केवळ अकाली दल आणि शिवसेना हेच दोन पक्ष भाजपाच्या गटात राहिले आहेत आणि ही आता तीन पक्षांची आघाडी उरली आहे. जनता दल (यु) ने आज संबंध तोडल्याचे जाहीर केले आहे. त्यांना संबंध तोडायला वेळ लागला कारण या संबंधातूनच राज्यातली म्हणजे बिहारमधली सत्ता साकार झाली होती.
आता संबंध तुटल्यास कदाचित सरकार कोसळेल किंवा जनता दल (यू) ला एकट्याने सत्ता हस्तगत करणे पूर्वीएवढे सोपी जाणार नाही. पण ती जोखीम घ्यायला नितीशकुमार तयार आहेत. कारण त्यांच्या दृष्टीने बिहारातल्या मुस्लिम मतांचा प्रश्न आहे. मोदींच्या भाजपाशी युती करणार की मुस्लिम मते गमावणार ? या संभ्रमात त्यांनी मोदींच्या भाजपाशी मैत्री तोडणे पसंत केले आहे. या दोन पक्षाची गेल्या १५ वर्षापासून सुरू असलेली युती अखेर तुटली आहे. या दोन पक्षांचा हा काडीमोड बिहारमध्ये असलेल्या सरकारमधील मतभेदांवरून झालेला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. आघाडीचे सरकार समजूतदार पणाने कसे चालवावे याचा आदर्शच या सरकारने उभा केला होता. श्री. नितीशकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना तसे मान्यही केले. आमचा ताळमेळ उत्तम होत असे ते म्हणाले. परंतु बाहेरच्या हस्तक्षेपामुळे हे दोन पक्ष परस्परांपासून दूर होत आहेत. हा बाहेरचा हस्तक्षेप म्हणजे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचा हस्तक्षेप. त्यांचा रोख नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे. २०१० साली झालेल्या बिहार विधानसभेपासून नितीशकुमार नरेंद्र मोदी यांना विरोध करीत आहेत पण भाजपात मोदी यांचे समर्थन वाढत आहे. ते जसे जसे वाढत आहे तसा नितीशकुमार यांचा मोदी विरोध उघड आणि स्पष्ट होत गेला.
यावरून मोदी आणि नितीशकुमार यांच्यात काहीतरी बेबनाव आहे असा आपला समज असेल तर आपण तो दूर केला पाहिजे. या दोघांमध्ये कसलाही वैयक्तिक वैरभाव नाही. प्रश्न मोदींच्या प्रतिमेचा आहे. २००२ सालच्या गुजरातच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची कट्टर हिंदुत्ववादी अशी प्रतिमा तयार झाली आहे. ती आपल्या सोयीची नाही असे नितीशकुमार यांना वाटत आहे. आपण मोदी नेतृत्व करत असलेल्या पक्षाशी युती करत असू तर बिहारमधील मुस्लिम मतदार आपल्या मागे उभे राहणार नाहीत अशी भीती त्यांना वाटते. ही भीती सयुक्तिक आहे की नाही यावरून वाद निर्माण झाले आहेत. भाजपाचा नेता कोण असावा हे भाजपानेच ठरवायचे आहे. भाजपाचा नेता संघश्रेष्ठींकडून मिळणार्या सूचनांवरून ठरतो आणि संघाच्या नेत्यांनी मोदींना हिरवा बावटा दाखविला आहे. संघाचे नेते मोदींची हिंदुत्ववादी प्रतिमा वापरून सत्ता काबीज करण्यास आतूर झाले आहेत. तो त्यांचा निर्णय आहे. त्यामुळे नितीशकुमार नाराज होतील आणि बिहारमधील आपले सरकार पडेल, रालो आघाडीतला एक घटकपक्ष बाजूला होईल हे सगळे त्यांना कळत नाही असे नाही. पण ही किंमत देऊनसुध्दा मोदींनाच नेता करायचे असे संघाने ठरवले आहे.मोदींच्या लोकप्रियतेच्या जोरावर देशात लोकसभेच्या २०० जागा मिळतील असा विश्वास संघनेत्यांना आणि भाजपातील राजनाथसिंह गटाला वाटत आहे. एक वेळ ही गोष्ट मान्य केली तरी २०० जागांवर सरकार स्थापन होत नाही हे भाजपाच्या नेत्यांच्या लक्षात येत नाही. मोदीसाठी भाजपाने रालो आघाडी मोडण्याची जोखीम घेतली आहे.
