मंगळवार, दि. १८ जून रोजी होणे अपेक्षित असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह निर्माण आणि नागरी गरिबी उन्मूलन मंत्री अजय माकन यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबरोबरच कॉंग्रेस पक्षातही संघटनात्मक बदल होणे अपेक्षित असून अजय माकन यांच्याकडे पक्षाचे सरचिटणीसपद दिले जाण्याची शक्यता आहे. ४९ वर्षीय अजय माकन हे दिल्ली प्रदेश कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मानले जातात. त्यामुळे त्यांच्याकडे दिल्ली प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्षपदही दिले जाईल, अशी पक्षात चर्चा आहे. शनिवारी रात्री त्यांनी अचानक आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे पक्ष संघटना आणि केंद्रीय मंत्रिमंडळात येत्या एक-दोन दिवसात मोठे फेरबदल होण्याच्या चर्चांना गती मिळाली आहे.
केंद्रीय मंत्री माकन यांचा राजीनामा
अजय माकन पूर्वी गृह राज्यमंत्री होते. नंतर त्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा स्वतंत्र कार्यभार सोपविण्यात आला. या मंत्रिपदाच्या काळात त्यांनी क्रीडा संघटनांमध्ये मोठे फेरबदल करणारे विधेयक तयार केले परंतु या विधेयकातील काही तरतुदी मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनाच पचवता आल्या नाहीत. काही ज्येष्ठ मंत्री क्रीडा संघटनांच्या महासंघांवर वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेले आहेत. त्यांना वयाची अट घालावी, अशी या तरतूद या विधेयकात करण्यात आली होती. त्याशिवाय एका अध्यक्षाने किती वर्षे अध्यक्षपद भोगावे यावरही काही बंधने घालण्याची तरतूद या विधेयकात होती. परंतु या दोन्ही अटी क्रीडा क्षेत्रातल्या अनेक मक्तेदारांना जाचक वाटल्या.
बीसीसीआय ही करोडो रुपयांची उलाढाल करणारी यंत्रणा केंद्र सरकारच्या अधिकाराखाली आणावी आणि तिला माहितीचा अधिकार लागू करावा, असेही या विधेयकात म्हटलेले होते. त्यामुळे तर अनेकांनी या विधेयकाला विरोध केला. सध्या आयपीएलच्या सामन्याच्या निमित्ताने जो तमाशा सुरू आहे तो पाहिला म्हणजे या मंत्र्यांनी अजय माकन यांच्या या विधेयकाला का विरोध केला होता हे लक्षात येते. या विरोधानंतर माकन यांना गेल्या ऑक्टोबर महिन्यात वेगळे खाते देऊन कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्यात आला होता. आता त्यांनी स्वत:हून राजीनामा दिला आहे. यापूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत. त्यामुळे निर्माण झालेल्या रिकाम्या जागा भरण्याच्या निमित्ताने पंतप्रधान मंत्रिमंडळाची फेररचना करणार आहेत.
