रेल्वेमंत्री सी.पी. जोशी यांचा राजीनामा

नवी दिल्ली – आगामी काळात केंद्रीय मंत्रिमंडळ आणि काँग्रेस पक्षात संघटनात्मक फेरबदलाचे संकेत मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी केंद्रीय रेल्वे मंत्री सी.पी. जोशी यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. जोशी यांच्याकडे राजस्थानमध्ये पक्षाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते. सोमवारी संध्याकाळी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल केले जाणार आहेत.

शनिवारी केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी दारिद्रय़ निर्मूलन मंत्री अजय माकन यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता रेल्वेमंत्री जोशी यांनीदेखील राजीनामा दिल्याने काँग्रेसने निवडणुकांची तयारी सुरु केल्याचे दिसते. माकन आणि जोशी हे दोघेही राहूल गांधी यांच्या मर्जीतले नेते आहेत. त्यामुळे त्यांना पक्षात महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल अशी शक्यता आहे.

द्रमुक व तृणमल काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे रिक्त झालेल्या जागाही या नव्या बदलात भरल्या जाऊ शकतात. सोमवारी संध्याकाळी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल केले जाणार असून प्रेमचंद गुड्डु आणि सज्जन वर्मा यांचा मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी ज्योती मिर्धा यांची रेल्वे मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. आगामी काळात होणा-या विस्तारात कोणा-कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.