पेट्रोलच्या दरात दोन रुपयांनी वाढ

डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या किंमतीच्या होत असलेल्या घटीमुळे पेट्रोलचा दर लिटरमागे दोन रुपयांनी वाढला आहे. एका डॉलरला ५८ पेक्षाही अधिक रुपये द्यावे लागत आहेत आणि पेट्रोलच्या आयातीचे बिल डॉलरमध्ये चुकते करावे लागते. त्यामुळे आयातीवर होणारा खर्च वाढला आहे. परिणामी पेट्रोल कंपन्यांनी पेट्रोलचे दर लिटरमागे दोन रुपयांनी वाढवले आहेत. शनिवारी मध्यरात्रीपासून हे दर लागू झाले आहेत.

कंपन्यांनी लिटरमागे दोन रुपये अशी वाढ जाहीर केली असली तरी स्थानिक पातळीवर लागू होणारे विक्री कर किंवा मूल्यवर्धित कर त्यात अंतर्भूत केलेले नाहीत. हे कर लागू झाल्यानंतर महाराष्ट्रात प्रत्यक्षात पेट्रोल लिटरमागे दोन रुपये ४० पैशांपर्यंत महागणार आहे. पेट्रोलच्या दरात चालू महिन्यात झालेली ही दुसरी वाढ आहे. या महिन्यात पूर्वी झालेल्या पेट्रोलच्या दरवाढीच्यावेळी डिझेलचे दर वाढले नव्हते. तसेच यावेळीही डिझेलचे दर वाढलेले नाहीत.

गेल्या तीन महिन्यात रुपयाची किंमत एका डॉलरला ५५ रुपये ३२ पैशांवरून ५८ रुपयांपर्यंत गेले आहे. त्यामुळे एक डॉलरच्या कच्च्या तेलाला पूर्वी ५५ रुपये द्यावे लागत होते आता ५८ रुपये द्यावे लागत आहेत. मार्च-एप्रिल आणि मे असे तीन महिने पेट्रोलचे दर वाढलेले नव्हते. कंपन्यांना कच्च्या तेलाच्या किंमती आणि रुपयाची किंमत यांच्या संदर्भात पेट्रोलचे दर वाढविण्याची अनुमती देण्यात आलेली आहे. परंतु त्यांनी तीन महिन्यांमध्ये पेट्रोलचे दर कायम ठेवले. आता मात्र १ जूनला पहिली वाढ केली आणि कालपासून दुसरी वाढ जारी केली. मार्च महिन्यात तर पेट्रोलच्या दरात घट करण्यात आली होती. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती ढासळल्यामुळे ही घट झाली होती. आता ही कच्च्या तेलाच्या किंमती वाढलेल्या नाहीत, परंतु डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला आहे म्हणून ही वाढ झाली आहे. महागाईच्या वरवंट्याखाली रगडल्या जाणार्‍या भारतीयांना पेट्रोलच्या या दरवाढीचा फटका चांगलाच जाणवणार आहे.

Leave a Comment