तार करायची आहे ? १५ जुलैपूर्वी करा

मुंबई, दि.१४ – पोस्ट खात्याची महत्त्वाची असलेली तार सेवा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे कडकट कडकट आवाज करून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या माणसांना संदेश देणे यापुढे शक्य होणार नाही. ही तार बंद होत असल्याने अनेकांना वाईट वाटत आहे.

टपाल खात्यातील १६० वर्ष जुनी असणारी ही तार सेवा येत्या १५ जुलैपासून बंद करण्यात येणार आहे. वाढत्या माहिती तंत्रज्ञानामुळे, तसेच मोबाईल, एसएमएस, इंटरनेट, ईमेल एवढेच नाहीतर फेसबुक, जीटॉक, व्हाट्स अॅबप, वी-चॅट यांसारख्या आधुनिक आणि फटक्यात संदेश आपल्या जवळच्यांपर्यंत पोहचवणार्‍या उपकरणांमुळे तार सेवा ही कालबाह्य झाली होती. त्यामुळे ही तारसेवा कायमची बंद करण्याचा निर्णय दिल्लीच्या संचार निगम कडून घेण्यात आलाय.

बी.एस.एन.एल.च्या व्यवस्थापनाखाली येणार्‍या सर्व दूरसंचार कार्यालयांना १५ जुलै पासून तार सेवेसाठी नोंदणी थांबविणे क्रमप्राप्त ठरणार आहे. मात्र तार वाहक युनियनने या निर्णयाला विरोध केला आहे.

सरकारचा हा निर्णय जरी एकीकडे बरोबर वाटत असला तरी, जिथे या आधुनिक तंत्रज्ञानाची साधी ओळखही नाही, तिथे असलेल्या लोकांना सरकार कोणती पर्यायी सुविधा देणार का, हा प्रश्नथ मात्र अनुत्तरीत आहे. काही असो परंतु दिडशे वर्ष केवळ संदेशच नाही तर संवेदनांची देवाण घेवाण करणारी तार आपल्यातून कायमची जाणार आहे ही गोष्टच मनाला चटका लावून जाणारी आहे.