युनायटेड नेशन्सच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार २०२८ सालापर्यंत भारत चीनला मागे टाकून सर्वाधिक लोकसंख्या असलेला जगातील पहिला देश असणार आहे. जगाची सध्याची लोकसंख्या ७.२ अब्ज इतकी आहे. या अहवालात ती १२ वर्षांत १० लाखांनी वाढेल आणि २०५० सालात ती ९.६ अब्जांवर पोहोचेल असे नमूद करण्यात आले आहे. लोकसंख्येतील ही वाढ प्रामुख्याने विकसनशील देशात आणि त्यातही आफ्रिकेत होण्याची शक्यता आहे .
सध्या जगाची एकूणच लोकसंख्या वाढ थोडी मंदावलेली असली तरी कांही विकसनशील देशांत लोकसंख्या वाढीचा वेग अजूनही जास्त आहे असे इकॉनॉमिक व सोशल अफेअरचे महासचिव वू होगबो यांचे म्हणणे आहे. मात्र विकसित देशांच्या लोकसंख्येत २०५० पर्यंत सध्याच्या १.३ अब्ज आकड्यात फारसा फरक पडण्याची शक्यता नाही. याच काळात जगातील ४९ विकसनशील देशांची लोकसंख्या मात्र दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. या देशांची लोकसंख्या ९०० दशलक्षांवरून १.८ अब्जांवर पोहोचेल असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
चीन, भारत, इंडोनेशिया, इराण, ब्राझील व दक्षिण आफ्रिकेतील कुटुंबात मुलांचे सरासरी प्रमाण कमी झाले आहे. चीनमधील लोकसंख्या वाढ मंदावली आहे मात्र भारतातील लोकसंख्या वाढ अजूनही म्हणावी तशी मंदावलेली नाही. यामुळे २०५० सालापर्यंत चीनला मागे टाकून भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल. त्या काळात या दोन्ही देशांची लोकसंख्या १.४५ अब्जांवर असेल असेही या अहवालात म्हटले गेले आहे. नायजेरिया, निगेर, कांगो, इथिओपिया, युगांडा या देशांतील लोक संख्येत लक्षणीय वाढ या काळात होईल असा अंदाज आहे.
विकसनशील आणि विकसित देशांतील नागरिकांचे आयुष्यमान मात्र वाढत चाणार असून २०४५ ते सरासरी ७६ वर्षांवर तर २०९५ ते २१०० पर्यंत ते सरासरी ८२ वर्षांवर जाईल असेही या अहवालात नमूद केले गेले आहे.