बालभारती पहिली, दुसरी पाठ्यपुस्तकाना उशीरा

पुणे दि.१३ – शिक्षणाचा खेळखंडोबा महाराष्ट्रात कसा चालला आहे याचे आणखी एक उदाहरण सामोरे आले आहे. यंदा राज्यातील सर्व शाळा १७ जूनला सुरू होत असताना इयत्ता पहिली आणि दुसरीची पाठ्यपुस्तके शाळा सुरू झाल्यानंतर दहा दिवसांनी विद्यार्थ्यांना मिळतील असे समजते. शालेय अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके तयार करणार्‍या बालभारतीत या पुस्तकांचे प्रिटींग अद्यापीही सुरू असून ही पुस्तके बाजारात येण्यास किमान १० दिवस लागणार आहेत.

पुस्तके उशीरा मिळण्याबाबत राज्य शिक्षण विभागाने नेहमीचेच रडगाणे गायले आहे. या दोन यत्तांचा अभ्यासक्रम बदलला गेल्यामुळे पुस्तक छपाईस उशीर झाल्याचे सांगितले जात आहे. अभ्यासक्रम बदलल्यानंतर त्यावरील सूचना हरकती मागविल्या गेल्या आणि त्यासाठी फेब्रुवारी उजाडला. मात्र नव्या अभ्यासक्रमाला मान्यता मिळण्यास मे महिना उजाडला. त्यानंतर पुस्तके छपाईसाठी बालभारती कडे देण्यात आली असे राज्य शिक्षण विभागाचे महावीर माने यांनी सांगितले.

नवीन पुस्तके उपलब्धच नसल्याने शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांना शिकविणे अवघड असल्याचे शिक्षक वर्गाचे म्हणणे आहे. अभ्यासक्रम बदलल्यामुळे जुन्या पुस्तकांवरून शिकविता येणार नाही तसेच नवीन पुस्तके शाळा सुरू झाल्यानंतर १० दिवसांनी मिळणार असल्याने शिक्षकांनाही नवीन सिलॅबसची तयारी करण्यास वेळ मिळणार नाही. नवीन सिलॅबस असेल तर तयारी साठी शाळा सुरू होण्यापूर्वी किमान आठवडाभर आधी पुस्तके मिळणे आवश्यक आहे असे शिक्षकांचे म्हणणे आहे कारण नवीन पुस्तकात नक्की कशाचा अंतर्भाव केला गेला आहे याची कल्पनाच नाही. परिणामी पहिली दुसरीतील विद्यार्थ्यांना सध्या तरी अ आ इ ई शिकण्यासाठी आणखी कांही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.