
चीनचे सरकार लोकसंख्या वाढीच्या बाबतीत फारच जागरूक आहे. तिथे एका दांपत्याला एकाच अपत्याला जन्म देण्याचा अधिकार आहे. मग तो मुलगा असो की मुलगी असो. एखाद्या जोडप्याला दोन मुले झाली तर त्यातले दुसरे मूल हे ब्लॅक चाइल्ड म्हणवले जाते. त्याला जन्म देणार्या आई वडिलांनी ६५ हजार येन्स दंड भरला पाहिजे अन्यथा त्या मुलाला किंवा मुलीला नागरिकत्वाचे हक्क मिळत नाहीत. लोकांना हा दंड परवडत नाही म्हणून लोक एका मुलानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतात. पती पत्नी म्हणून कायद्याने बांधलेल्या दांपत्यावर असे निर्बंध आहेतच पण काही मुली लग्नाच्या आधीच माता होतात. अशी मुले काही सरकार सांभाळत नाही. त्या मुलांची जबाबदारी त्या मातांवर किंवा त्याच्या अवैध पित्यावरच असते पण सरकारचे असे मत आहे की, त्या मुलाचा सांभाळ त्याच्या मातेने केला तरीही अशा मुलांमुळे सरकारला बराच जादा खर्च येत असतो. म्हणून सरकारने कुमारी मातांना जबर दंड ठोठावण्याचे ठरवले आहे. वुहान प्रांतात असा कायदा करण्यात आला आहे. ज्या मुलीला लग्नाच्या आधीच मूल होईल तिला त्या वुहान राज्यातल्या दरडोई दरसाल होणार्या खर्चाच्या सहापट एवढी रक्कम सरकार जमा करावी लागेल. हा कायदा केला जाणार असल्याचे वुहान प्रांतातल्या एका सरकारी दैनिकाने म्हटले आहे. या बातमीने समाजात मोठीच खळबळ माजली आहे.
