लंडन दि.१३ – हॅरी पॉटर या काल्पनिक हिरोला मिळालेली प्रसिद्धी कल्पनातीत आहे. रोलिंगने लिहिलेल्या या बुक सिरीजला अतोनात लोकप्रियता मिळाली आणि अद्भूत कथा असणार्या या पुस्तकांच्या कोट्यावधी प्रती हा हा म्हणता खपल्या. या पुस्तकातीलच एक कल्पना म्हणजे हॅरीला अदृष्य करणारी झूल. झूल पांघरताच हॅरी अदृष्य होतो. ही कल्पना संशोधकांनी आता प्रत्यक्षात उतरविली असून असे एक उपकरण तयार केले आहे की ज्यामुळे माणसाला अदृष्य होणे शक्य होईल. सध्या या उपकरणाच्या सहाय्याने पाण्यात पोहणारा गोल्ड फिश आणि टेबलावर बसलेली मांजर अदृष्य करण्यात संशोधकांना यश आले आहे.
नानयान टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, सिंगापूर येथील संशेाधकांनी ही किमया साध्य केली आहे. त्यांनी असा एक क्लोक तयार केला आहे ज्यामुळे वस्तू अदृष्य होऊ शकतील. प्रयोगात प्रथम फिश टँकमधील गोल्फ फिश या क्लोकमधून पोहताना अदृष्य झाला मात्र त्याचवेळी टँकमधील अन्य वनस्पती मात्र दिसत होत्या. आणखी एका प्रयोगात टेबलवर बसलेल्या मांजरीच्या बुडाशी हा क्लोक अॅडजस्ट करण्यात आला तेव्हा मांजरीचा हा भाग अदृष्य झाला असे संशोधकांना आढळले.
या उपकरणात संशोधकांनी अशा ग्लास पॅनलचा वापर केला आहे की ज्यामुळे जी वस्तू पाहायची तिच्याकडून परावर्तित होणारे किरण वाकतात व परिणामी वस्तू अदृष्य झाल्याचा भास होतो. या तंत्रज्ञानामुळे सुरक्षा विभाग व टेहळणी विभागाला अनेक उपयुक्त उपकरणे मिळू शकणार आहेत असाही संशोधकांचा दावा आहेत मात्र त्यासाठी आणखी थोडे संशोधन करणे आवश्यक आहे. सध्याच्या बेसिक उपकरणात कांही ठराविक अँगलमध्येच वस्तू अदृष्य झाल्याचे भासते तसेच त्यासाठी वापरला जात असलेला क्लोक अंधुक का होईना पण नजरेस येतो. हे दोष दूर केले गेले तर अदृष्य करणारे उपकरण प्रत्यक्षात येईल असा संशोधकांचा दावा आहे.