रालो आघाडीत पडझड

भारताचे राजकारण कसे झाले आहे ? या राजकारणातली पहिली आघाडी म्हणजे कॉंग्रेसची आघाडी काम करीत नाही, दुसरी आघाडी म्हणजे भाजपाची आघाडी टिकत नाही आणि तिसरी आघाडी तयारच होत नाही. चौथी आघाडी कागदावरही येत नाही. १९९८ साली भाजपाचे सरकार सत्तेवर आले तेव्हा तृणमूल कॉंग्रेस, जनता दल, अकाली, शिवसेना, समता पार्टी, तेलुगु देसम, द्रमुक, अद्रमुक, बिजू जनता दल, असे १८ पक्ष आघाडीत होते पण आता त्यातले केवळ अकाली दल आणि शिवसेना हेच दोन पक्ष शिल्लक राहिले आहेत. कॉंग्रेसचे स्थान जनतेच्या मनातून कमी होत असतानाच आघाडीच्या राजकारणात भाजपाचे खच्चीकरण होत आहे. आता जनता दल(यू) या पक्षाने भाजपापासून फारकत घेण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या पक्षाने भाजपाला नरेन्द्र मोेदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पुढे करू नये असे आवाहन केले होते पण आता भाजपाला मोदीच सत्तेवर आणू शकतील असा विश्‍वास भाजपाला वाटत आहे म्हणून त्यांनी जनता दलाची पर्वा न करता मोदीच आपले नेते असतील असे जाहीर केले आहे. भाजपाला नेता म्हणून मोदींचा लाभ झाला आहे पण त्याच्या बदल्यात आपल्या मित्र पक्षांना मुकावे लागत आहे. खरे तर भाजपाच्या समोर हा तिढा आहे. पण भाजपाला मोदीच मते मिळवून देतील असा विश्‍वास वाटत आहे. भाजपाला १९९८ साली स्वबळावरच १८५ जागा मिळाल्या होत्या. त्याला नंतर मित्र पक्ष मिळत गेले. तशी अवस्था आता निर्माण व्हायला लागली आहे.

भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या जनता दल (यू) पक्षाने बर्‍याच दिवसापासून भाजपाला मोदी यांच्याबाबतीत सावध केले होते पण भाजपाने यावर दोन प्रकारांनी उत्तर दिले. एकतर पक्षाने मोदी यांना नेता करावे का नाही हा भाजपाचा अंदरूनी मामला आहे. भाजपा नेत्यांचे हे म्हणणे खरे आहे कारण भाजपाची जनता दलाशी युती आहे. युतीचा अर्थ असा नाही की, भाजपाने आपले निर्णय जनता दलाशी चर्चा करून ठरवावेत. आपला नेता कोण असावा हे ठरवण्याचा हक्क भाजपाला आहे. तो जनता दलाचे नेते नितीशकुमार यांना मान्यही आहे. पण अशा स्थितीत भाजपाशी असलेली दोस्ती तोडण्याचा हक्क त्यांनाही आहे. नितीशकुमार यांनी आता भाजपाशी युती केली तर बिहारमधले मुस्लिम मतदार त्यांना मते देणार नाहीत अशी भीती त्यांना वाटायला लागली आणि त्यांनी भाजपाशी असलेले संबंध तोडण्याचे संकेत दिले. शेवटी त्यांच्याही अस्तित्वाचा प्रश्‍न आहे. २००४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा तर कमी झाल्याच पण त्यांच्या मित्रपक्षांनाही मोठा फटका बसला. या मित्र पक्षांनी आपल्या पराभवाचे विश्‍लेषण केले तेव्हा असे दिसून आले की आपण भाजपाशी युती केल्यामुळे आपले मुस्लिम मतदार आपल्या विरोधात गेले आहेत. तेव्हापासून भाजपाच्या एकेका मित्र पक्षांनी भाजपापासून दूर जाण्यास सुरूवात केली. बिहारात भाजपा आणि जनता दल (यू ) यांच्या आघाडीचे सरकार सत्तेवर असल्याने तिथे जनता दलाने युती मोडली नाही. पण येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने मोदी यांना नेता केले तर राज्यातले मुस्लिम मतदार आपल्यापासून दूर जातील म्हणून भाजपाने मोदी यांना गुजरातच्या बाहेर फार महत्त्व देऊ नये असे टुमणे लावले. ते भाजपाशी असलेली दोस्ती तोडणार नाहीत असे वाटले होते कारण तसे केल्यास बिहारमधील आपल्या सरकारचा बळी द्यावा लागतो पण ही अपेक्षा फोल ठरवीत जनता दलाने संबंध तोडण्याचे संकेत दिले आहेत. भाजपाला यापूर्वी याच मुद्यावरून तेलुगु देसम, बिजू जनता दल, द्रमुक या पक्षांनी सोडचिठ्ठी दिली आहे आणि त्यावरून भाजपाला खूप नुकसान सहन करावे लागले आहे. बिजदशी झालेल्या विच्छेदानंतर भाजपाला ओरिसातली सत्ता गमवावी लागली आहे. तृणमूल कॉंग्रेस, मुलायमसिंग यांची समाजवादी पार्टी यांची भाजपाशी आघाडी होण्यात तशा काहीच अडचणी नाहीत पण भाजपाशी दोस्ती म्हणजे मुस्लिम मते गमावणे हे त्यांना माहीत आहे. म्हणून हे पक्ष भाजपापासून दूर राहू इच्छितात. जयललिताही मोदी यांची प्रशंसा करतात पण म्हणून भाजपाशी युती करण्याचे कारण नाही असेही बजावतात.

आज देशात कॉंग्रेसच्या विरोधात वातावरण आहे पण तरीही कॉंग्रेसला पराभूत करण्याची ताकद एकट्या भाजपात नाही. भाजपा आणि अन्य काही पक्षांची युती अर्थात एनडीए आघाडी केली तरच कॉंग्रेसचा पराभव होऊ शकतो. मात्र भाजपाचे नेते मोदी असतील तर अशी दोस्ती होत नाही. यावर दोन उपाय आहेत. एक म्हणजे भाजपाने आपल्या स्वत:च्या बळावर निवडणूक लढवणे आणि स्वबळावर लोकसभेच्या २०० च्या आसपास जागा जिंकून ऐनवेळी जमेल त्यांच्याशी युती करून सरकार स्थापन करणे. भाजपाच्या नेत्यांना मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे शक्य होईल असे वाटत असावे म्हणून ते आपल्या मित्र पक्षांचे म्हणणे धुडकावून मोदींना पुढे करीत आहेत. भाजपाच्या नेत्यांना कितीही विश्‍वास वाटत असला तरीही भाजपाची ताकद तेवढी नाही हे सर्वांना माहीत आहे. यावर नितीशकुमार यांनी मोदींच्या ऐवजी अडवाणी हा पर्याय सुचविला आहे. अडवाणी यांना भाजपाने नेता केले तर भाजपाचे मित्रपक्ष त्यांचे नेतृत्व मानू शकतात असे नितीशकुमार यांचे म्हणणे आहे. खरे तर याही म्हणण्यात तथ्य नाही. कारण अडवाणींना नेता करावे असे केवळ नितीशकुमार यांचे म्हणणे आहे. भाजपाशी पूर्वी दोस्ती केलेल्या अन्य कोणत्याही पक्षाने तसे म्हटलेले नाही. नेते अडवाणी असोत की मोदी असोत त्यांना भाजपाशी संगच नको आहे. एकंदरीत राजकारण एका विशिष्ट वळणावर येऊन थांबले आहे.

Leave a Comment