न्यू यॉर्क दि.१२ – हवाई इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोनॉमी मधील खगोल शास्त्रज्ञ जेफ कह यांनी परग्रहावरील जीवसृष्टी अथवा परग्रहवासींचा वेध घेऊ शकेल अशी ७७ मीटर लांबीची दुर्बीण तयार करण्यात यश मिळविल्याचा दावा केला आहे. ७७ मीटर म्हणजे २५० फूट लांबीची ही दुर्बीण पृथ्वीपासून ६० ते ७० प्रकाशवर्षे दूर असलेल्या कोणत्याही ग्रहावर एलियन्सच्या वसाहती असतील तर त्याचा अचूक वेध घेऊ शकणार आहे. परग्रहांवर जेथे एलियन्स असतील त्यांच्या वस्तीतून बाहेर पडणार्या उर्जेच्या मदतीने ही दुर्बीण हा शेाध घेऊ शकणार आहे.
जेफ यांच्या मते ही दुर्बीण बनविण्याचा पूर्ण आराखडा तयार असून त्यासाठी १ अब्ज डॉलर्स खर्च येणार आहे. अनुदान मिळाले तर पाच वर्षात ही दुर्बीण तयार केली जाईल असेही त्यांनी सांगितले. कोलोसस असे तिचे नामकरण करण्यात आले असून ही जगातील कोणत्याही मोठ्या दुर्बीणीपेक्षा दुप्पट मोठी असेल.
आजपर्यंत परग्रहावर एलियन्स आहेत का हा नेहमीच खगोलशास्त्रज्ञांच्या चर्चेचा विषय राहिला आहे. त्यासाठी बीम सिग्नल थेअरीचा वापर केला जातो. गेली चार दशके हे प्रयत्न सातत्याने केले जात आहेत मात्र अजून तरी त्यातून कांहीही हाती लागलेले नाही असे सांगून जेफ म्हणाले की या पद्धतीला कांही मर्यादा पडतात. कदाचित एलियन्स सिग्नल देत नसतील किवा कदाचित माणूस कल्पनाही करू शकणार नाही अशा अतिप्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ब्रॅाडकास्ट चॅनलचा वापर ते करत असतील.
जेफ यांनी तयार केलेली दुर्बीण एलियन्सना कोणत्याही प्रकारची जाणीव होऊ न देता त्यांचे सिग्नल पकडू शकणार आहे. त्यासाठी अर्थात तार्यापेक्षा अंधारे पण उष्णतेमुळे अधिक तेजस्वी दिसणारे ग्रह निवडले जातील कारण अशा ग्रहांवर जीवसृष्टी असण्याची शक्यता सर्वाधिक आहे असे त्यांचे म्हणणे आहे.