धर्मेंद्र, सनी, बॉबीची धम्माल पुन्हा एकदा!

देओल कुटुंबीयांनी पुन्हा एकदा पडद्यावर लोकांना हसवण्यासाठी एकत्र प्रयत्न केलाय. ’यमला पगला दिवाना – २’मध्ये धर्मेंद्र आपल्या दोन्ही मुलांसोबत म्हणजेच बॉबी आणि सनी देओलसोबत धम्माल करताना दिसणार आहे. फूल टू मसाला असाच हा सिनेमा आहे. पण, ’यमला पगला दिवाना’चा पहिल्या भागापेक्षा तो थोडा थिटा वाटतो.

सिनेमाची कथा धर्मेंद्र सनी आणि बॉबी या तिघांच्या भोवतीच घुटमळते. धरम ( धर्मेंद्र) आपला छोटा मुलगा गजोधरसोबत (बॉबी देओल) वाराणसीमध्ये मोठ्या थाटात राहतोय. धरमचा मोठा मुलगा परमवीर (सन्नी देओल) हा ब्रिटनमध्ये राहतो. परमवीरकडून आर्थिक मदत मिळाल्यानंतर धरम आणि गजोधर लोकांना ’उल्लू’ बनवून त्यांना भंडावून सोडण्याच्या कामात व्यस्त आहेत.

धरम आणि गजोधर ब्रिटनचा एक व्यावसायिक योगराज खन्ना (अन्नू कपूर) याला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात. योगराज यमला बाबाचा आशिर्वाद घेण्यासाठी ब्रिटनवरून भारत आलाय. योगराजबरोबर त्याची मुलगी सुमन (नेहा शर्मा) हीदेखील भारतात आलीय. सुमन बॉलिवूड स्टार सलमान खानची खूप मोठी फॅन आहे. गजोधरनं सुमनला आपल्या प्रभावाखाली घ्यावं अशी धरमची इच्छा आहे कारण त्यामुळे त्यांनाही ब्रिटनमध्ये जाण्याची संधी मिळू शकणार आहे. पिता-पुत्र आपल्या या प्रयत्नात यशस्वी होतात आणि ब्रिटनमध्ये पोहचतात.

धरम आणि गजोधर ब्रिटनमध्ये पोहचल्यानंतर त्यांना कळत की त्यांनी खूप मोठा ’पंगा’ आपल्या अंगावर ओढावून घेतलाय. कारण परमवीर खन्नासाठीच काम करतोय. इथूनच सिनेमा वेगळ्या ढंगात आणखी मजेशीर, धम्माल प्रसंग घेऊन पुढे सरकतो. अभिनयाचं म्हटलं तर धर्मेंद्र, सनी आणि बॉबी प्रेक्षकांच्या अपेक्षाना थोडे कमी पडलेले जाणवतात.

बॉलिवूडमध्ये या सिनेमाच्या माध्यमातून प्रवेश करणार्याल क्रिस्टिना अखीवा प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात अपयशी ठरलीय. तिला आणखी खूप काही शिकणं बाकी आहे. अनुपम खेर, जॉनी लिवर आणि सुचेता शर्मा यांनी आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिलाय. सिनेमातील संगीतही प्रेक्षकांवर फार मोठा परिणाम करत नाही.

एकूणच काय तर हा सिनेमा हास्यप्रधान असला तरी तुम्हाला खळखळून हसवण्यात मात्र थोडा कमी पडतो. सिनेमाची कथा थोडी मार खाते. दिग्दर्शकानं सिनेमाच्या कथेवर थोडी मेहनत घेतली असती तरी चाललं असतं. रिअल लाईफमधली धर्मेंद्र सनी आणि बॉबी ही बाप-लेकांची तिकडी प्रेक्षकांना भावते.

Leave a Comment