भारत उपांत्य फेरीत

ओव्हल (लंडन)- रवींद्र जडेजाच्या प्रभावी गोलंदाजीनंतर सलामीवीर शिखर धवनच्या सलग दुस-या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजवर आठ गडी राखून विजय मिळवला. 

प्रथम फलंदाजीकरत वेस्ट इंडिजने भारतापुढे विजयासाठी 234 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताकडून सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 101 धावांची सलीमी दिली. शर्मा 52 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली 22 धावांवर बाद झाला. अखेर शिखर धवन आणि दिनेश कार्तिक यांनी तिस-या विकेटसाठी नाबाद 109 धावांची भागीदारीकरत संघाला विजय मिळवून दिला.

त्याआधी डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाच्या (10-2-36-5) वनडेतील सर्वोत्तम कामगिरीनंतरही चँपियन्स ट्रॉफीच्या बी ग्रूप’मध्ये मंगळवारी वेस्ट इंडिजने निर्धारित षटकांत नऊ बाद 233 धावांची मजल मारली. सलामीवीर जॉन्सन चार्ल्सच्या (55 चेंडूंत 60 धावा) संयमी आणि डॅरेन सॅमीच्या (35 चेंडूंत नाबाद 56 धावा) फटकेबाजीमुळे दोनशेपार पोहोचता आले.

शेवटच्या चार षटकांत बहाल केलेल्या 51 धावा वगळता भारताची गोलंदाजी प्रभावी आणि नियंत्रित झाली. त्याचे सर्वाधिक अष्टपैलू जडेजाला जाते. त्याने 36 धावांत विंडिजचा निम्मा संघ गारद करताना वनडेतील वैयक्तिक कामगिरी नोंदवली. चँपियन्स ट्रॉफीच्या इतिहासात भारतातर्फे नोंदवलेली ही सर्वोत्तम गोलंदाजी ठरली. जडेजाला भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि इशांत शर्मा या मध्यमगती त्रिकुटासह ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनची (प्रत्येकी एक विकेट) सुरेख साथ लाभली.

मात्र डॅरेन सॅमीने भारताच्या अचूक मा-याचा सक्षमपणे सामना करताना विंडिजला 233 धावांपर्यंत पोहोचवले. त्याने दहाव्या विकेटसाठी कीमार रोचसह 27 चेंडूंत नाबाद 51 धावांची भागीदारी करताना भारताचे वर्चस्व कमी केले. शेवटच्या विकेटसाठी साकारलेली ही दुसरी सर्वात जलद भागीदारी ठरली. आश्चर्य म्हणजे या भागीदारीत रोचचे एकाही धावेचे योगदान नाही. सॅमीने शेवटच्या दोन षटकांत 35 धावा कुटल्या. इशांत शर्माच्या शेवटच्या षटकात त्याने दोन चौकार आणि तितक्याच षटकारांसह 21 आणि त्यानंतर जडेजाच्या षटकात दोन चौकार आणि एका षटकारासह 14 धावा वसूल केल्या. सॅमीने वनडेतील पाचवे अर्धशतक ठोकताना पाच चौकार आणि चार षटकारांची आतषबाजी केली.

तत्पूर्वी, धोकादायक ख्रिस गेलला (21) लवकर माघारी धाडत भुवनेश्वरने पाचव्या षटकात भारताला पहिला ब्रेक’ मिळवून दिला तरी सलामीवीर चार्ल्स (60) आणि डॅरेन ब्राव्होने (35) दुस-या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी करताना संघाचे शतक फलकावर लावले. मात्र रवींद्र जडेजाला गोलंदाजीसाठी आल्यानंतर चित्रच बदलले. एक बाद 103 वरून विंडिजची अवस्था चार बाद 109 अशी झाली. पहिले षटक निर्धाव टाकलेल्या जडेजाने वैयक्तिक दुस-या षटकात चार्ल्सला पायचीत पकडले. त्यानंतर मार्लन सॅम्युअल्स (1) आणि रामनरेश सरवानला (1) झटपट माघारी धाडले.

जडेजाच्या गोलंदाजीवर सॅम्युअल्सला अंपायर अलीम दार यांनी नाबाद ठरवले. मात्र भारताने तिस-या अंपायर्सकडे दाद मागितली. त्यांनी सॅम्युअल्सला बाद ठरवले. भारताचा हा रिव्हयू’ यशस्वी ठरला. चेंडू पॅडला प्रथम लागल्याचे हॉट स्पॉट’मध्ये दिसले. मधली फळी कोसळल्याने वेस्ट इंडिज दोनशेची मजल मारेल किंवा नाही, याबाबत साशंकता होती. मात्र सॅमीच्या फटकेबाजीने भारताचे वर्चस्व कमी झाले.

दुस-या लढतीत भारतीय संघाने कुठलाही बदल केला नाही. मात्र यष्टिरक्षक दिनेश रामदिनवर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आल्याने वेस्ट इंडिजने त्याच्या जागी डॅरेन सॅमीचा अंतिम संघात समावेश केला. रामदिनच्या अनुपस्थितीत जॉन्सन चार्ल्सकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली

 

Leave a Comment