गुजरातमध्ये उभारतोय जगातील सर्वात उंच पूतळा

आगामी 2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या प्रचारप्रमुखपदी भाजप नेते आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली. या निवडीमुळे भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. मात्र मोदी यांनी याकडे दुर्लक्ष करून आता नवी मोहीम हाती घेतली आहे. ती मोहीम म्हणजे लोहपुरूष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात मोठा पूतळा उभा करण्याची आहे. त्यासाठी आवश्यक असणारे लोखंड हे देशातील शेतकर्‍यांकडून संग्रहीत करण्यात येणार आहे. तेही शेतकरी जे अवजार शेतात मशागतीसाठी वापरतात. त्यातील काही भाग या पूतळ्यासाठी गोळा केला जाणार असल्याचे नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी बोलताना सांगितले.

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंच असणारा हा पूतळा नर्मदा नदीच्या पात्रात उभारण्यात येणार आहे. तसेच त्या पूतळ्याच्या पायाभरणीमध्ये स्मारक आणि इतरही काही गोष्टी करण्यात येणार आहेत. हा पूतळा पाहण्याकरता जाण्यासाठी पाण्यातून जावे लागणार आहे, त्यासाठी वेगळा मार्ग बनविण्यात येणार आहे. हा पूतळा अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा जवळपास दुप्पट उंचीचा असणार आहे. त्यामुळे हा पूतळा जगातील सर्वात उंच पूतळा म्हणून ओळखला जाईल. या प्रकल्पासाठी सुमारे 2000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

पटेल यांचा पूतळा उभारल्यानंतर गुजरातचे नाव एका वेगळ्या उंचीवर जावून पोहचेल. ते ठिकाण एक पर्यटनस्थळ बनविले जाणार आहे. तसेच त्याठिकाणी पर्यटकांना आवश्यक सोयी सुविधाही दिल्या जाणार आहेत. हा पूतळा बनविल्यानंतर त्या ठिकाणी संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, विद्यापीठ, अनेक कोर्सेस तसेच थीमपार्कचीही उभारणी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

विशेष म्हणजे गुजरातमधील भाजप सरकारला 7 ऑक्टोबर 2010 रोजी 10 वर्षे पूर्ण झाली, त्यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यु ऑफ युनिटी या प्रकल्पाची घोषणा केली होती.

 

Leave a Comment