पवारांचा दुसरा धक्का

शरदराव पवार यांनी पक्षात क्रान्तिकारक बदल करायचे म्हणून सगळ्याच मंत्र्यांचे राजीनामे घेतले आणि राजकारणात एक धक्का दिला. आता सर्वांना अशी उत्सुकता लागली होती की पवार कोणते क्रान्तिकारक बदल करतील ? पण मोठा आव आणून त्यांनी सामूहिक राजीनाम्याचा निर्णय घेतला आणि केवळ सहा किरकोळ बदल केले. सर्वंसाठी हा खरा धक्का ठरला. म्हणजे पवारांनी आठवडाभरात दोन धक्के दिले. त्यांनी सर्व 17 राजीनाम्यातले सहा राजीनामे स्वीकरून बाकीच्या सर्वांचे राजीनामे नाकारले. हे पाहिल्यावर कोणाच्याही मनात असा प्रश्‍न निर्माण होईल की, सहाच मंत्र्यांचे राजीनामे घ्यायचे होते आणि त्यातले बहुतेक मंत्री ‘सकारण’ आणि सहज वगळता येत होते तर मग एवढे सोंग कशाला केले ? पवारांनी काल आपल्या राजीनामे घेण्याच्या निर्णयाची हवा स्वत:च काढण्याचा प्रयत्न केला. आपण राजीनामे घेतले नसून त्यांनी स्वत:हून सामूहिकपणे राजीनामे दिले आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. खरे तर काँग्रेसचा मंत्री मग तो राष्ट्रवादीचा का असेना स्वत:हून मंत्रिपदाचा राजीनामा देईल हे संभवत नाही. तेव्हा पवार काहीही म्हणत असले तरीही यातल्या कोणीही स्वत:हून राजीनामा दिलेला नव्हता.

पवारांनी ते राजीनामे घेतले होते. आपण काही तरी विशेष करीत आहोत असे दाखवून देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता. पण त्यांना यातून फार मोठे बदल करता आले नाहीत. सार्‍या वल्गना आणि घोषणा ओम फस झाल्या. माध्यमांच्या प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची कला पवारांना चांगलीच माहीत आहे. त्याचाच हा प्रकार होता. सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले हे पवारांचे धक्का तंत्र आहे असेही कोणी म्हणाले. पण राजीनामा नाट्याचे एकेक पदर उलगडत जायला लागले तसे हा धक्का कसा व्यर्थ आहे हे दिसायला लागले. पवारांनी सर्वांचे राजीनामे घ्यावेत असे आता तरी काही घडले नव्हते. मग हे सोंग कशाला आणले ? त्यांनी फार मोेठे बदल केले नाहीत. अगदी सामान्य बदल केले. भास्कर जाधव, गुलाबराव देवकर आणि लक्ष्मण ढोबळे यांना मंत्रिमंडळातून वगळले. राज्यात दुष्काळ पडला असताना जाधव यांनी आपल्या मुलीचा विवाह करताना संपत्तीचे बिभत्स प्रदर्शन घडवले. हा प्रकार पवारांना आवडला नव्हता. त्याच वेळी पवारांनी अशा लोकांना पक्षात आणि सामाजिक जीवनात काही स्थान नाही असेही म्हटले होते. त्यांची ही भावना आणि तिच्यातली तीव‘ता पाहता पवारांनी जाधवांना तेव्हाच मंत्रिमंडळातून वगळायला हवे होते.

गुलाबराव देवकरांचा मान तर फार पूर्वीच वगळण्याचा होता. जळगावच्या घरकुल घोटाळ्यात त्यांना आरोपी करण्यात आले होते. त्यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला म्हणून आणि त्या प्रत्येक पायरीवर त्यांच्या अटकेला स्थगिती मिळत गेली म्हणून अर्थात तांत्रिक आधारावर ते तुरुंगाच्या बाहेर राहिले होते. अन्यथा त्यांना फार पूर्वी वगळायला हवे होते. वगळलेले तिसरे मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांना का वगळले आहे हे काही स्पष्ट झाले नाही. त्यांच्यावर आता तरी काही भ‘ष्टाचाराचा आरोप झालेला नाही पण पक्षातले काही तरी अंतर्गत कारण असावे. रामराजे निंबाळकर, बबनराव पाचपुते आणि प्रकाश सोळंखे यांनाही पवारांनी वगळले आहे. पवारांनी सर्वांचे राजीनामे घेतले तेव्हा पक्षात आणि मंत्रिमंडळात असे काही परिवर्तन होईल की, आता पक्ष बावनकशी सोन्यासारखा शुद्ध होऊन जनतेसमोर येईल असे वाटले होते. पण या संबंधात बर्‍याच अपेक्षा व्यक्त केल्या गेल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी किरकोळ बदल केलेे. हे सहाही मंत्री पवारांच्या सांगण्यातले आहेत. पवारांनी त्यांना आपल्या निवासस्थानी बोलावून घेऊन राजीनामे देण्यास सांगितले असते तरीही त्या सहा जणांनी मुकाटपणे राजीनामे दिले असते. पण सहा जणांसाठी सर्व सतरा जणांचे सामूहिक राजीनामे मागण्याची काय गरज होती ?

पवारांनी राजीनामे घेऊन धक्का तंत्र राबवले आहे की नाही हे माहीत नाही पण डोंगर पोखरून उंदीर काढल्यागत बदल करून मात्र सर्वांना धक्का दिला आहे. सर्वांना असे वाटले होते की मंत्रिमंडळातले दिग्गज मंत्री बदलले जातील आणि त्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले जाईल. पण वगळण्यात आलेल्यातले दोघे वगळता कोणीही लोकसभेचे उमेदवार नाहीत. पक्षाला येत्या लोकसभा निवडणुकीत केवळ दोन ते चार जागा मिळतील या पाहणीच्या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर हा धक्का प्रयोग करण्यात आला आहे पण या बदलाने या निष्कर्षाने चार-दोन जागांची वस्तुस्थिती काही बदलेल असे दिसत नाही. छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्या भ‘ष्टाचाराची तर किती लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. भुजबळावर केलेले सर्वच आरोप खरे नाहीतअसे पवारांना वाटते पण पक्षाच्या प्रतिमेसाठी कोणा मंत्र्याला वगळायचे असेल तर भुजबळ आणि तटकरे या दोन फिट केसेस आहेत पण पवारांना सध्याच्या राज्याच्या राजकारणात हे धाडस करता आलेले नाही. पवारांच्या या धक्का तंत्राने काँग‘ेसपुढे कसलेही आव्हान उभे राहिलेेले नाही. तीही चर्चा आता विरली आहे.