विटेनबर्ग दि.११ – उत्तर जर्मनीच्या कांही भागात एल्ब नदीला आलेल्या महापराचा फटका हजारो नागरिकांना बसला असून नागरिकांचे स्थलांतर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रविवारपासूनच नदीच्या पाण्याची पातळी वाढत चालली आहे. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मार्केल यांनी या स्थळाला दोन दिवसांत तीन वेळा भेट दिली असून येथे सुरू असलेल्या मदतकार्याची माहिती घेतली आहे.
मध्य युरोपात एल्ब नदीला आलेला हा पूर एतिहासिक असल्याचे सांगितले जात आहे. यात आत्तापर्यंत १९ नागरिकांचा बळी गेला असून हजारो घरे पडली आहेत. हजारेा नागरिकांना अन्यत्र सुरक्षित जागी हलविले जात आहे. पुरामुळे अब्जावधी युरोचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. बंडनबर्ग राज्यात नदीवरील बंधारा फुटला असून सरकारने १०० दशलक्ष युरोची मदत पुरग्रस्तांसाठी जाहीर केली आहे.
या आणीबाणीच्या परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित हलविण्यात आणि बंधारा फुटलेल्या जागी वाळूची पोती रचण्यात मदत करणार्या स्वयंसेवकांचे कौतुक चॅन्सलर मार्केल यांनी केले आहे. या भागात लष्कराला मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. नदीवरील बंधार्याला ५० मीटर लांबीची भेग पडल्याने परिस्थिती आणखीन बिकट बनली असल्याचे समजते. मॅगडेबर्ग भागातील २३ हजार नागरिक घरे सोडून अन्यत्र गेले आहेत. या पुराचा फटका चार राज्यांना बसला आहे.