देशामध्ये भाजीपाला आणि धान्याच्या भावाची खूप चर्चा होते. परंतु कधी कधी लसूण, आले, कोथिंबीर, धने, हिंग, जिरे, मिरे अशा किरकोळ वाटणार्या मसाल्यांचे भाव भलतेच वधारतात. अशा प्रसंगी ते कितीही वाढले तरी त्यांची कोणी चर्चा करत नाही. सध्या आल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. पण आपले आल्यावाचून काही अडत नाही म्हणून आपण अशा भावाची दखल घेत नाही. पण सध्या आल्याचा भाव 11 हजार रुपये क्विंटल झाला आहे. आपल्या बाजारात आले येते, आपण सारी भाजी खरेदी केल्यानंतर एक रुपयाचे आले घेतो. भाव वाढल्यास भाजीवाला रुपयाचे आले देत नाही. कमीत कमी दोन रुपयाचे आले घ्यावे लागते. पण त्यामुळे आपण फार विचार करत नाही. खरे तर हा भाव दुप्पट झालेला असतो. आता तो तिप्पट वाढला आहे. महाराष्ट्रामध्ये त्याचे फारसे परिणाम जाणवत नसले तरी केरळ आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या अर्थव्यवस्थांवर जाणवण्याइतका परिणाम झालेला दिसतो. कारण या दोन राज्यात आल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
गेल्या महिन्यात आल्याचा दर 2 हजार रुपये क्विंटल असा होता. बाजारात आल्याची आवक झाली की, तो असा कोसळतो. परंतु सुरुवातीला 2 हजार रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होताना यावर्षी आवक कमी झाली आहे याची जाणीव झाली नव्हती. नेहमीप्रमाणे भाव कोसळण्याची वाट बघणार्या व्यापार्यांना यावर्षी आल्याचे उत्पादन कमी झाल्याचे लक्षात यायला लागले आणि भाव कोसळण्याऐवजी ते चक्क 11 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत चढले. केरळाचा वायनाड परिसर आणि कर्नाटकातील दक्षिण भाग यामध्ये आल्याचे उत्पादन प्रचंड प्रमाणावर घेतले जाते. कर्नाटकाच्या हसन, कोडगू, शिमोगा, चिकमंगळूर, मैसूर या जिल्ह्यात 29 हजार हेक्टर जमिनीवर आल्याचे उत्पादन घेतले जाते. भारतात अन्यही प्रांतात आल्याचे पीक घेतले जाते आणि याबाबतीत जगात भारताचा पहिला क‘मांक आहे. 2012-13 या हंगामात 7 हजार 56 हजार टन आल्याचे उत्पादन होईल, असा अंदाज होता. जगातल्या आल्याच्या उत्पादनाच्या 21 टक्के उत्पादन भारतात होते. त्यामुळे जगभरातले आल्याचे आणि सुंठीचे दर भारतातल्या उत्पादनावर ठरतात. यंदा भारतात उत्पादनात 60 टक्के घट येणार आहे. त्यामुळे आले कडाडले आहे. परंतु यंदा चीन, इंडोनेशिया, नेपाळ आणि थायलंड या देशातले आल्याचे उत्पादन चांगले झालेले आहे. तिथून भारतामध्ये आवक व्हायला लागली की, भारतातले दर कोसळतील आणि ते नेहमीप्रमाणे 4 हजार रुपये प्रति क्विंटलवर येऊन स्थिरावतील अशी आशा व्यापार्यांनी व्यक्त केली आहे. भारतातून आल्याची निर्यात मोठ्या प्रमाणावर होते. त्याचबरोबर आल्यापासून सुंठ तयार करून तीही निर्यात केली जाते. संयुक्त अरब अमिराती, अमेरिका, बांगला देश, सौदी अरबस्तान, जर्मनी, बि‘टन, स्पेन, इजिप्त या देशांना 2011-12 या वर्षात 35 हजार टन सुंठ निर्यात झालेली आहे. आपल्याला आले ही किरकोळ वस्तू वाटते, पण देशाच्या अर्थव्यवस्थेत त्याचे मोठे स्थान आहे.