राज कुंद्रावर कारवाई

नवी दिल्ली, दि.10 – आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचा सहमालक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला निलंबित करण्यात आले आहे. सोमवारी बीसीसीआयच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कुंद्राचे वकील माजिद मेमन यांनी बीसीसीआयचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. बीसीसीआयने कोणत्या आधारावर कुंद्रांच्या विरोधात कारवाई केली असल्याचा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे. ते मंडळाच्या निर्णयाला आव्हान देणार आहेत.

बीसीसीआयच्या कार्यकारिणीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून राज कुंद्रा आपल्याच संघावर सट्टा खेळत असल्याचे त्याने दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीत मान्य केले आहे, असे दिल्ली पोलिस आयुक्त निरज कुमार यांनी म्हटले होते. त्यानुसार सोमवारी बीसीसीआयच्या कार्यकारिणीची तातडीची बैठक बोलावण्यात आली.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचेही राजस्थान रॉयल्स संघात 11 टक्के समभाग आहेत. राजस्थान रॉयल्स संघातील अंकित चव्हाण,श्रीशांत आणि अजित चंडेलिया या तिघा खेळाडूंना झालेल्या अटकेनंतर स्पॉट फिक्सिंग प्रकरण उजेडात आले.

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी राज कुंद्रा याच्याविरोधात कोणताही सबळ पुरावा नसल्याचे बीसीसीआयच्या अधिका-यांनी याआधीच सांगितले आहे. मात्र दिल्ली पोलिसांनी कुंद्रावर लावलेल्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी बीसीसीआयनेही याप्रकरणी त्याची कसून चौकशी केली आहे.

बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या अध्यक्षतेखाली अंतरिम अहवाल तयार करण्यात आला आहे. या अंतरिम अहवालात कुंद्रावरील आरोप सिद्ध झाल्यास राजस्थान संघ आयपीएलमधून बाद होऊ शकतो. त्याशिवाय श्रीशांत, अजित,अंकित यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात येऊ शकते.

कुंद्रावर आपल्याच टीमवर सट्टा लावल्याचा आरोप आहे. कुंद्राने मागील तीन वर्षांत सट्टयावर सुमारे एक कोटी रूपये लावले होते, असे म्हटले जाते. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार शिल्पा शेट्टीनेही एक लाख रूपयांचा सट्टा खेळला होता. तिने हा सट्टा कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यादरम्यान खेळण्यात आलेल्या सामन्यावर लावला होता.

Leave a Comment