बूढों के सपने, जवानों के अरमान

1979 साली जनता पार्टीत चरणसिंग, मोरारजी आणि जगजीवनराम या तीन वृद्ध नेत्यांत नेतृत्वासाठी संघर्ष झाला आणि त्यातच पक्ष मोडला. तेव्हा वाजपेयी 52 वर्षांचे होते. म्हणजे तुलनेने तरुण होते. पक्षातल्या या फुटीविषयी बोलताना तेव्हा वाजपेयी म्हणाले होते. बूढों के सपने पूरे हो गये लेकीन जवानों के अरमान अधूरे रह गये. आताही भाजपात तशीच स्थिती निर्माण झाली आहे. अडवाणी के सपने और मोदी के अरमान यांच्यात टकराव निर्माण झाला आहे. रेल्वे रूळ बदलते तेव्हा थोडासा खडखडाट होतच असतो. तसा कोणत्याही पक्षातला नेतृत्वबदल होताना काहीशी आदळ आपट, थोडी कुरबुर, नाराजी होणे अपरिहार्य असते. ती अपरिहार्य असते पण टाळता येत नाही असे काही नाही. नव्या पिढीच्या हातात नेतृत्वाची सूत्रे देताना जुन्या पिढीने सामंजस्याने वागायचे ठरवले आणि मोठ्या उमदेपणाने सूत्रे सोपवली तर हा खडखडाट टळू शकतो पण सर्वच ज्येष्ठ नेत्यांना तसे भान नसते. भारतीय जनता पार्टीतच नाही तर देशातल्या सर्वच राजकीय पक्षांत असे नेते संघर्षाला कारणीभूत ठरायला लागले आहेत.

खरे तर आता देशव्यापी ख्याती असलेल्या नेत्यांची वानवा आहे. तसा नेता तयार होणे हे काही सोपे काम नाही. आता देशाच्या राजकारणात स्थानिक आणि प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व वाढत आहे आणि त्या त्या राज्यापुरते मर्यादित असलेले नेतेच राजकारणात दिसत आहेत. देशाचे लक्ष वेधून घेणारे नेते निर्माण होण्याची शक्यता केवळ काँग्रेस आणि भाजपा या दोनच पक्षात आहे. भाजपात तसे नेते म्हणून नरेन्द्र मोदी यांचा उदय होत आहे. त्यांच्या राजकीय भूमिकेविषयी मतभेद होऊ शकतील पण तसा नेता भाजपाजवळ आहे ही भाजपासाठी तरी अप्रुपाची बाब आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे पण त्याऐवजी ते मोदी यांचा दुस्वास करीत आहेत. त्यातून अप्रिय असा संघर्ष निर्माण होत आहे. या संघर्षाचा अडवाणी यांना कसलाही फायदा नाही. पण मोदी आणि भाजपा यांना तोटा आहे. आपण असा संघर्ष करता कामा नये हे अडवाणी यांना समजेनासे झाले आहे. एखाद्या कुटुंबातली सासू आपल्या हातातली सत्ता सहजा सहजी सोडत नाही. तिच्यात अधिकाराची लालसा असते. ती हातातली सूत्रे लवकर आणि सुखासुखी सोडत नाही. सूत्रे सोडावीच लागली तर ती सोडताना आदळ आपट करते. सासू आणि सून यांचे नाते मोठे विचित्र असते. खरे तर ते नाते नसून तणावपूर्ण संबंध असतो.

लालकृष्ण अडवाणी यांनी आता सासूची भूमिका इमाने इतबारे निभावण्याचा निर्धारच केला आहे असे दिसते. नितीन गडकरी हे पक्षाचे अध्यक्ष झाल्यापासून अडवाणी यांनी, नव्या सुनांना चांगला संसार करता येत नाही म्हणून आदळ आपट करणार्‍या सासूप्रमाणे वागायला सुरूवात केली होती. त्यांनी वयाची 85 वर्षे पार केली आहेत आणि त्यातच देशाचे विभाजन करण्याचे अधम काम करणार्‍या बॅ. जीना यांची आरती गायिली त्यामुळे ते भाजपात साईडला पडले आहेत. त्यामुळे त्यांची आदळआपट कोणीच ऐकत नाही. म्हणून त्यांनी ब्लॉगवरून आपली कुरकुर जारी ठेवली. नव्या नेत्यांना पक्ष कसा चालवावा हे कळत नाही असे ते वारंवार म्हणायला लागले. साधारणत: पक्षातले स्थान गमावलेले पण तरीही महत्त्वाकांक्षेला लगाम घालण्यास असमर्थ ठरलेले वृद्ध नेते अशीच किरकिर करीत असतात. आपला पक्ष मूळ तत्त्वज्ञानापासून भरकटत चालला आहे, पक्षाच्या संस्थापकांना अभिप्रेत असलेल्या कार्यप‘णालीपासून पक्ष ढळलेला आहे अशी त्यांची तक‘ार असते. अडवाणी गेल्या चार वर्षापासून सतत अशा तक‘ारी करीत आहेत. खरे तर प्रत्येक पक्षात अशा नेत्यांचा एक काळ असतो. त्या काळात ते पक्षाला उपयुक्त ठरलेले असतात. त्यांनी पक्षाला सावरलेले असते. पक्षाला उर्जितावस्थेला आणलेले असते. पण अशा सर्वच नेत्यांची उपयुक्तता सदसर्वकाळकायमच असते असे नाही. परिस्थिती बदलली की त्यांची उपयुक्तता संपते. असा प्रकार अडवाणीच काय पण अनेक थोर नेत्यांच्या आयुष्यात घडला आहे.

अडवाणी यांना आपली उपयुक्तता संपली आहे हे समजेनासे झाले आहे. त्यांनी पक्षाच्या स्थापनेपासूनची पंचवीस वर्षे उमेदीने काम केले आहे आणि तशी पदेही भोगली आहेत. देशाचे गृहमंत्रीपद आणि उपपंतप्रधानपदही भोगले आहे. तेव्हा आता समाधानाने निवृत्त व्हावे हे त्यांना का कळत नाही, असा प्रश्‍न पडतो. अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधानपदावरून निवृत्त होताच विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आणि ते आता पक्षात कसलाही हस्तक्षेप करीत नाहीत. मोरारजी देसाई यांनीही एके काळी असाच निर्णय घेऊन स्वत:ला सकि‘य राजकारणापासून दूर केले होते. अडवाणी यांनीही आता आपण पक्षाच्या दैनंदिन व्यवहारापासून अलिप्त राहणार आहोत अशी घोषणा करून राजकारण संन्यास घ्यायला हवा. आता त्यांना पक्षात काही स्थान नाही. पण असे लोक कधीच समाधानी नसतात. मग ते कोणीच किंमत देईनासे झाले की त्रागा करून तीर्थयात्रेला जायला निघणार्‍या सासूप्रमाणे वैतागून राजीनामा देतात. त्याऐवजी, आता पक्षाचे काय व्हायचे असेल ते होऊ देत असे म्हणून त्यांनी निरिच्छपणाने स्वत:ला पक्षापासून दूर करायला हवे. पण अहं आडवा येत आहे.

Leave a Comment