अटातटीच्या लढतीत न्यूझीलंड विजयी

लंडन – रविवारी झालेल्या अटातटीच्या लढतीत न्यूझीलंडच्या शेपटाने लसिथ मलिंगाच्या गोलंदाजीला धैर्याने तोंड दिले.साऊथीने दमदार फलंदाजी करत न्यूझीलंडसाठी ‘टीम मॅन’ ठरला. श्रीलंकेच्या १३८ धावांना उत्तर देताना मलिंगाने न्यूझीलंडचे धाबे दणाणून सोडले होते. परंतु प्रथम मॅक्कलम बंधू व नंतर साऊथी ‘टीम न्यूझीलंड’साठी धावून आले. त्यामुळे किवीला एक गडी राखून सामना जिंकता आला.

रविवारच्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. श्रीलंकेचा ‘सलामीवीर’ कुशल परेरा पहिल्याच चेंडूवर मिल्सची शिकार ठरल्यावर कुमार संगक्काराने एक बाजू लावून धरली असताना तिलकरत्ने दिलशान (२०), महेला जयवर्धने (४), दिनेश चंडिमल (०), कर्णधार अँजेलो मॅथ्यूज (९), लाहिरू थिरिमाने (९), थिरासा परेरा (१५), रंगना हेराथ (नाबाद ८), शमिंडा इरंगा (०) व लसिथ मलिंगा (२) यांनी मात्र हजेरी लावली. कुमार संगक्काराने ८७ चेंडूंना सामोरे जात ६८ धावा काढल्या. या खेळीमुळेच श्रीलंकन संघ १३८ धावांपर्यंत मजल मारू शकला.

विजयासाठी १३९ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडची अवस्थासुद्धा ६ बाद ८० अशी झाली होती. परंतु कर्णधार ब्रायन (१८) व अष्टपैलू नॅथन (३२) या मॅक्कलम बंधूंनी न्यूझीलंडला विजय मिळवून देण्याचा विडाच उचलला होता. परंतु मलिंगाने मॅक्कलम बंधूंना बाद करून श्रीलंकेसाठी विजयाचे दार उघडले. साऊथीने (नाबाद १३) धावा करत पराभव टाळला. त्याला मिल्स (३) व मॅकलघन (नाबाद १) यांनी सुयोग्य साथ दिली व ‘टीम न्यूझीलंड’ने श्रीलंकेच्या घशात गेलेला विजय साऊथीमुळे खेचून आणला.

Leave a Comment