श्रीशांत, अंकितसह 18 जणांना जामीन

नवी दिल्ली, दि.10 – आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील आरोपी एस. श्रीशांत आणि अंकित चव्हाण या दोन क्रिकेटपटूंना जामीन मंजूर झाला आहे. दिल्लीतील साकेतच्या विशेष मोक्का कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

श्रीशांत आणि अंकितसह एकूण 18 जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये 14 सट्टेबाजांचाही समावेश आहे. तर यातील आणखी एक आरोपी अजित चंडीला याला जामीन मिळालेला नाही. चंडीलाने जामीनासाठी अर्ज दाखल केला नसल्याचं कळतं.

या सर्वांवर संघटित गुन्हेगार असल्याचे पुरावे नाहीत. शिवाय गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याने या आरोपींवर मोक्का लावणं चुकीचं आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे.

क्रिकेट खेळताना खेळाडूंना घाम येत असल्याने रुमालाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे याचा चुकीचा अर्थ घेण्यात येऊ नये, असं श्रीशांतच्या वकिलांनी याचिकेत म्हटलं होतं. कोर्टाने ही बाब ग्राह्य धरून सर्व आरोपींना जामीन मंजूर केला. जामीन मंजूर झाल्याने सर्वांचा उद्या संध्याकाळपर्यंत तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी स्पॉट फिक्सिंगप्रकरणी 26 जणांवर मोक्का लावला होता. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा फिक्सिंग आणि सट्टेबाजांच्या रॅकेटशी संबंध असल्याचे पुरावे, दिल्ली पोलिसांच्या हाती लागले होते. त्यामुळेच या सर्वांवर मोक्का अंतर्गत कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Comment