लालकृष्ण आडवाणींनी दिला सर्व पदांचा राजीनामा

नवी दिल्ली, दि.10 – भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी भाजपमधील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सूत्रे नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवल्यामुळे आडवाणी नाराज झाले होते. त्यामुळे आडवाणी यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीचे अध्यक्षपद तसेच संसदीय कार्यकारिणीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

आडवाणी यांनी भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. भाजप पक्ष ज्या विचाराने काढला होता. त्या विचाराने तो चालत नाही. जे काही निर्णय घेतले जात आहेत, त्याबाबत काहीही विचारणा केली जात नाही. त्यामुळे आपण मी आपल्या पदांचा राजीनामा देत आहे, असे आडवाणी यांनी नमूद केले आहे.

भाजपच्या तीन दिवस पणजी येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आडवाणींनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देऊन उपस्थित राहण्याचे टाळले. मात्र, रविवारी भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी आगामी 2014 च्या लोकसभा निवडणुकीची धुरा मोदी यांच्याकडे सोपवल्यानंतर, नाराज झालेल्या आडवाणी यांनी भाजपमधील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

पक्षाच्या सध्याच्या कार्यपद्धतीशी जूळवून घेणे मला अवघड जात आहे. शामप्रसाद मुखर्जी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांपासून पक्ष भरकटत चालला आहे. हाच भाजप पक्ष आहे का, असा मला प्रश्‍न पडला आहे. आमच्या अनेक नेत्यांना राजकीय भवितव्यापेक्षा वैयक्तिक अजेंडाच महत्त्वाचा वाटतो, असे आडवाणी यांनी राजनाथ सिंग यांना लिहिलेल्या पत्रात आपली खंत व्यक्त केली आहे.

दरम्यान, राजनाथ सिंग यांनी सोमवारी आडवाणी यांची त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.

गोव्यात भाजपची तीन दिवशी बैठक पार पडली. या बैठकीच्या शेवटच्या दिवशी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची 2014च्या लोकसभा निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तशी घोषणा भाजप अध्यक्ष राजनाथसिंग यांनी केली होती. पक्षात मोदींना जास्तच महत्व देण्यात येत असल्याने आडवाणी नाराज होते. या नाराजीतून आडवाणी यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment