राजनाथ सिंग यांच्यावरील दबाव वाढला

पणजी- भाजप कार्यकारीणीची बैठक सध्या गोव्यात सुरु आहे, आगामी काळात म्हणजेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकित प्रचारमोहिम समितीच्या प्रमुखपदी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना करण्यावरून सध्या खल सुरु आहे. या बैठकीत मोदींच्या नावाच्या घोषणेवरून पक्षाध्यक्ष राजनाथ सिंग यांच्यावर संघाकडून दबाव वाढत चालला आहे. दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी या बैठकीला गैरहजर असल्याने वेगळीच चर्चा रंगली आहे. त्यामुळे रविवारी शेवटच्या दिवशी पक्षाच्या व्यासपीठावर अडवाणी यांना आणून चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न काही जणाचा आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी तर मोदीच्या नावाची घोषणा होणार की नाही यावरून उत्सुकता लागली आहे.

शनिवारी पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या अडवाणी यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत पक्षाध्यक्षांनी रविवारी प्रचार प्रमुखाच्या नावाची घोषणा करावी असे सांगितले आहे. अडवाणी यांनी अजून एक समांतर ‘निवडणूक व्यवस्थापन समिती’ स्थापन करण्याची मागणी केली आहे. एका मध्यस्था मार्फत राजनाथ सिंग यांनी अडवाणी यांच्याशी संपर्क साधण्याचा पुन्हा प्रयत्न केला. मात्र अडवाणी त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत.

दुस-या बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोदींच्या नावाची घोषणा करण्यासाठी भाजप अध्यक्षांवर दबाव वाढवला असल्याचे वरिष्ठ पक्षसूत्रांनी सांगितले आहे. अडवाणी बैठकीला येवोत अथवा न येवोत मोदींच्या नावाची घोषणा करण्याचे स्पष्ट आदेश अध्यक्षांना दिले आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष राजनाथ सिंग आज काय करतात याकडे लागले आहे.

Leave a Comment