सोमनाथ – पहिले ज्योतिर्लिंग

गुजराथेतील सौराष्ट्रात वेरावळ जवळ असलेले सोमनाथ मंदिर हे शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगातील पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते. समुद्रकिनारी असलेले हे सुंदर मंदिर त्याच्या प्रभावशाली इतिहासासाठी तरी नक्कीच पाहायला हवे. या मंदिराचा इतिहास फारच प्राचीन असून या स्थानाचे वर्णन स्कंदपुराण, शिवपुराण, नंदीपुराण, श्रीमद् भागवत असा प्राचीन ग्रंथांमध्येही केले गेले आहे.

Dwarka3

(फोटो सौजन्य – somnath)

या मंदिरामागची कथा सांगतात ती अशी की दक्ष प्रजापती हा भगवान सोम म्हणजे चंद्राचा सासरा. त्याने आपल्या २७ मुलींचा विवाह सोमाबरोबर करून दिला होता मात्र चंद्राचे अधिक प्रेम होते ते रोहिणीवर. त्यामुळे रागावलेल्या दक्षाने चंद्राला त्याचे तेज जाईल असा शाप दिला आणि चंद्र निस्तेज झाला. या शापातून मुक्ती मिळविण्यासाठी ब्रह्माने चंद्राला प्रभास तीर्थावर म्हणजे सध्याच्या जागी शिवाची उपासना करण्याचा सल्ला दिला. चंद्राने तशी उपासना केली आणि शिव प्रसन्न झाले. मात्र चंद्राचे तेज त्याला परत मिळाले तरी शापाचा परिणाम म्हणून चंद्राच्या कला राहिल्याच. त्यामुळेच चंद्र रोज थोडा मोठा होताना दिसतो तसाच कमी होतानाही दिसतो असा समज आहे.

शापातून मुक्त झालेल्या चंद्राने येथे सोमनाथाचे मंदिर बांधले ते सोन्याचा वापर करून. त्यानंतर हे मंदिर नष्ट झाले तेव्हा रावणाने हेच मंदिर चांदीत बांधले. तेही नष्ट झाले तेव्हा भगवान श्रीकृष्णाने हे मंदिर चंदनाच्या लाकडात बांधले. हेही मंदिर कालाच्या ओघात नष्ट झाले तेव्हा राजा भीमदेव याने हे मंदिर दगडात बांधले असा इतिहास आहे.

Somnath

हे मंदिर अतिशय श्रीमंत देवस्थानात एक गणले जात होते अणि मुस्लीम आक्रमकांनी ते १७ वेळा लुटून नेले असेही इतिहास सांगतो. १०२४ साली गझनीच्या महंमदाने ते लुटले ते १७०१ सालात सुलतान अल्लाऊद्दीन पर्यंत अनेक वेळा ते लुटले गेले.१७०१ सालात याच मंदिराचे खांब वापरून औरंगाबादेत मशीद बांधली गेली असेही सांगतात. त्यानंतर मात्र पेशवे, अहिल्याबाई होळकर, नागपूरचे भोसले यांच्या प्रयत्नातून ते १७८३ साली पुन्हा उभे केले गेले. १९५० साली सरदार वल्लभभाई पटेल या लोहपुरूषानच्या प्रयत्त्नातून येथे बांधलेली मशीद हटवून पुन्हा मंदिर उभारले गेले.

Somnath1

सध्याचे मंदिर कैलास महामेरू प्रसाद स्टाईलने बांधले गेले असून मंदिरात सोमनाथाची प्राणप्रतिष्ठा १९५१ साली तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते केली गेली आहे. मंदिरात गर्भगृह, सभामंडप, नृत्यमंडप असून शिखर १५० फूट उंचीचे आहे. मंदिराचा कळस १० टन वजनाचा असून त्यावरचा ध्वजस्तंभ २७ फूट उंचीचा आहे. मंदिराजवळ असलेला तीर्थस्तंभ अशा ठिकाणी उभा केला गेला आहे की तेथून दक्षिण ध्रुवापर्यंत जमीन नाही. हा अबाधित समुद्रमार्ग म्हणजे भूगोलाचे भारतीय विद्धानांना किती अचून ज्ञान होते याचा पुरावाच म्हणावा लागेल.

Somnath2

सोमनाथ मंदिरापासून जवळच हरिहर तीर्थधाम आहे. येथे भगवान श्रीकृष्ण निजधामास गेले अशी श्रद्धा आहे. येथून जवळच असलेल्या भल्का तीर्थीवर भगवान श्रीकृष्णांच्या पायाच्या अंगठ्याला हरीण समजून मारलेला भिल्लाचा बाण लागला. त्यानंतर भगवान हिरण, कपिला आणि सरस्वती नदी जेथे समुद्राला मिळतात त्या स्थानी आले आणि हिरण नदीच्या काठावर त्यांनी आपले प्राण त्यागले. येथेच जवळ गीतामंदिरही बांधले असून त्यात १८ संगमरवरी खांबांवर गीता कोरली आहे. जवळच लक्ष्मीनारायण मंदिर असून बलराम गुंफाही जवळच आहेत. येथून श्रीकृष्णाचे बंधू बलराम निजधामास पाताळात गेले असा समज आहे.

सोमनाथ येथे जाण्यासाठी अहमदाबाद पासून रेल्वे, रस्ते सुविधा चांगल्या आहेत. अंतर आहे ४६५ किमी. अन्य ठिकाणांहून अहमदाबाद येथे विमान सेवेचाही लाभ घेता येतो. तीर्थक्षेत्री राहण्याजेवण्याची सुविधा चांगली आहे. तेव्हा या ज्योतिर्लिंगाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.

Leave a Comment